आजघडीला मनोरंजन विश्वात अभिनेत्री देखील अभिनेत्याच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. केवळ अभिनेत्रीचं नव्हे तर, अनेक इतर कामे देखील स्त्रिया यशस्वीपणे सांभाळत आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा भारतीय चित्रपटांत स्त्री पात्रे देखील पुरुष कलाकार साकारत असत. अशा काळात एका स्त्रीने चित्रपटात काम करून मनोरंजन विश्वात मोठा बदल घडवून आणला. या अभिनेत्रीचे नाव आहे दुर्गा खोटे. दुर्गाबाईंनी खऱ्या अर्थाने महिलांसाठी मनोरंजन विश्वाची दारे खुली केली.
१४ जानेवारी १९०५ हा दुर्गा खोटे यांचा जन्मदिवस. वयाच्या १८ व्या वर्षी दुर्गा खोटे यांचे लग्न झाले. अतिशय श्रीमंत कुटुंबात दुर्गाबाई नांदत होत्या. मात्र, दोन मुलं पदरात असताना अर्ध्यावरच त्यांचा संसार मोडला. पतीच्या निधनामुळे दुर्गा खोटे एकट्या पडल्या. पतीच्या निधनानंतर दुर्गा यांच्या आयुष्यात सर्व काही बदलले. यानंतर त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. दुर्गा खोटे स्वतः शिक्षित होत्या.
वाचा: डोक्यावर टोपी, तोंडाला मास्क; बॉलिवूड सुपरस्टारचा लपूनछपून मेट्रोने प्रवास
उदर निर्वाहासाठी त्यांनी आधी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. दरम्यान त्यांना 'फरेबी जाल' चित्रपटात काम करण्याची ऑफर आली. आर्थिक अडचणींमुळे दुर्गा यांनी ही भूमिका स्वीकारली. या चित्रपटात दुर्गा यांना केवळ १० मिनिटांची भूमिका करायची होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांना सामाजिक टीकेला सामोरे जावे लागले होते. यानंतर मात्र त्या मागे हटल्या.
१९३० साली मर्सिडीज बेंझ गाडीची जाहीरात प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्या जाहीरातीत दुर्गाबाई मॉडेल म्हणून झळकल्या होत्या. दुर्गाबाई या पहिल्या मराठी स्त्री असाव्यात ज्यांना इतक्या मोठ्या जाहीरातील मॉडेल म्हणून झळकण्याची संधी मिळाली. आपल्यासाठी निश्चितच ही एक अभिमानाची गोष्ट आहे.