मराठी मनोरंजन विश्वात नेहमीच वेगवेगळे प्रयोग होताना दिसतात. चित्रपट, मालिका, वेब सीरिज यानंतर आता रंगभूमीवर देखील एक आगळावेगळा प्रयोग करण्यात येणार आहे. आतापर्यंत आपण एआय टेक्नॉलॉजी केवळ सोशल मीडिया आणि इतर वेगवेगळ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. मात्र, आता एक नवं नाटक येणार आहे. नुकतीच पहिल्यावहिल्या मराठी महाबालनाट्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘आज्जीबाई जोरात’ असे नाटकाचे नाव असून, लेखक क्षितीज पटवर्धन या नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. या नाटकाने आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे.
क्षितीज पटवर्धन याने आतापर्यंत ‘डबल सीट’, ‘फास्टर फेणे’, ‘धुराळा’ अशा प्रसिद्ध चित्रपटांचे लेखन केले आहे. लेखक म्हणून आजवर क्षितीज पटवर्धन याने भरपूर नाव कमावले आहे. त्याने अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या कथा आणि चित्रपटांची गाणी देखील लिहिली आहेत. नाटक, चित्रपट, जाहिराती, कविता, गाणी अशा अनेक माध्यमात लेखन करणारा क्क्षितीज पटवर्धन आता दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. क्षितीज पटवर्धन याने नुकतीच त्याच्या नव्या नाटकाची घोषणा केली असून, हे एक बालनाट्य असणार आहे. या नाटकाने सगळ्यांचीच उत्सुकता वाढवली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढण्यामागचं कारण म्हणजे या नाटकाला पहिलं ‘एआय महाबालनाट्य’ असं म्हटलं गेलं आहे. आता एआय नाटक म्हणजे नेमकं काय बरं? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.
आता केवळ या नाटकाचं एक पोस्टर शेअर करण्यात आलं असून, यामध्ये कोण दिसणार, एआय म्हणजे नेमकं काय असणार? यासाठीची उत्सुकता ताणून धरण्यात आली आहे. या नाटकाचं पोस्टर शेअर करताना लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन याने लिहिलं की, ‘पहिलं एआय महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’, ३० एप्रिलपासून सगळ्या सुट्ट्या जोरात जाणार! ३० एप्रिलपासून लहान मोठे जोरात हसणार! येईल मज्जा मज्जा!’, असं म्हणत एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे.
या पोस्टरवर ‘पहिलं एआय महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ मनानं लहान असणाऱ्या प्रत्येकासाठी’, असं म्हटलं गेलं आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावर ‘आजी येते’ अशा आशयाच्या पोस्ट पाहायला मिळाल्या होत्या. या पोस्ट चांगल्याच व्हायरल झाल्या होत्या. तेव्हापासून ही आजीबाई नक्की कोण? अशी उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. आता ही आजी कोण याचा खुलासा झाला आहे. या बालनाट्यासाठी ‘आजी येतेय’ असा टॅग वापरत प्रमोशन करण्यात आलं होतं. या दरम्यान क्षितीज पटवर्धनने आपल्या नाटकाची घोषणा करत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक प्रेक्षक वर्गाची आतुरता शिगेला पोहोचवली आहे.