Firing At Ap Dhillon House: कॅनडातील व्हँकुव्हरमध्ये पंजाबी गायक एपी ढिल्लन याच्या घराबाहेर नुकत्याच झालेल्या गोळीबाराच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. व्हिक्टोरिया बेटावर घडलेल्या या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याच बेटावर एपी ढिल्लन याचे घर येथे आहे. गोळीबारानंतर सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, गोळीबार करणाऱ्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र, लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदारा टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १ सप्टेंबरच्या रात्री कॅनडातील व्हिक्टोरिया बेट आणि वुडब्रिज, टोरंटो येथे गोळीबार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि रोहित गोदाराने दोन्ही घटनांची जबाबदारी घेतल्याचा दावा केला आहे. एपी ढिल्लनच्या बंगल्यावर गोळीबार करण्यात आल्याचंही पोस्टमध्ये लिहिलं आहे. यासोबतच सलमान खान आणि ढिल्लन यांच्या नात्याबद्दलही टिप्पणी करण्यात आली आहे.
पोस्टमध्ये धमकीवजा शब्दात म्हटले आहे की, जे लोक अंडरवर्ल्ड लाईफची नक्कल करतात, ते आयुष्य प्रत्यक्षात आपण जगत आहोत. कोणी आपल्या मर्यादेत न राहिल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा या पोस्टची सत्यता पडताळण्यात व्यस्त असून, गोळीबाराचे कारण शोधण्याचाही प्रयत्न करत आहेत.
या घटनेपूर्वीही लॉरेन्स बिश्नोई टोळीने असाच प्रकार केला होता. काही महिन्यांपूर्वी परदेशात गिप्पी ग्रेवालच्या घरी गोल्डी बिश्नोई टोळीने गोळीबार केला होता. कॅनडाच्या पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही आणि कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
या प्रकरणावरून लॉरेन्स बिश्नोई टोळीचा वाढता प्रभाव दिसून येत आहे. याआधी १४ एप्रिल २०२३ रोजी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्येही गोळीबार झाला होता. दोन मोटारसायकल स्वारांनी ही घटना घडवली. घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना गुजरातमधून अटक केली आणि बिश्नोई टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. एपी ढिल्लन याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराने कॅनडातीलच नव्हे तर, भारतातील सुरक्षा यंत्रणांही सतर्क झाली आहे. अंडरवर्ल्ड टोळ्यांच्या कारवाया आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही पसरत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.