Bollywood Nostalgia : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला 'द रोशन्स' हा माहितीपट सध्या खूप चर्चेत आहे. रोशन कुटुंबाभोवती फिरणाऱ्या या माहितीपटात हृतिक रोशनपासून त्याचे वडील राकेश रोशन आणि आजोबा रोशन यांच्यापर्यंत अनेक मोठे खुलासे करण्यात आले आहेत. 'द रोशन्स'मध्ये अभिनेत्याच्या आईने म्हणजेच पिंकी रोशन यांनी हृतिकला 'कहो ना प्यार है' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान उदास का वाटू लागले, हे सांगितले.
२०००साली राकेश रोशन यांनी आपला मुलगा हृतिक रोशन याला 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून लॉन्च केले होते . मात्र, त्याच्या या पहिल्या चित्रपटासाठी त्याच्यावर खूप दबाव होता. फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्याबरोबरच, तो आपली कला परिपूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नव्हता. पण, शूटिंगदरम्यान तो वडिलांसोबत सेटवर अनेकदा वाद घालायचा.
हृतिक रोशनची आई पिंकी रोशन यांनी खुलासा केला की, 'कहो ना प्यार है' या चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर तो घरी यायचा, तेव्हा उदास व्हायचा. हृतिकच्या आईने 'द रोशन्स'मध्ये सांगितले की, ‘मी त्याला कधी-कधी उदास पाहायचे आणि विचारायचे की,काय झाले? तुला बरे वाटत नाही. मग, शेवटी तो यातून बाहेर पडायचा आणि मला एखाद्या वेगळ्या पद्धतीने सांगायचा. तो म्हणायचा की, मला एखादी गोष्ट माझ्या पद्धतीने करायची असेल, तरी त्याचे बाबा म्हणजेच राकेश रोशन तसं करू देत नव्हते. त्याचं बोलणं ऐकताना आई म्हणून मला वाईट वाटायचे.’
हृतिक रोशनला दुःखी पाहून पिंकी पतीसोबत भांडायला जायच्या. पान त्यावेळी राकेश रोशन म्हणायचे की, 'त्याला काही कळत नाही, मी दिग्दर्शक आहे मला चित्रपट बनवायचा आहे. मी दिग्दर्शक आहे.' पिंकी समजावण्याचा प्रयत्न करायच्या. मात्र, त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. त्यामुळे या चित्रपटाच्या सेटवर हृतिक रोशन आणि राकेश रोशन यांच्यात खूप वाद व्हायचा. यावर राकेश म्हणाले की, ‘त्याच्यासाठी मी दिग्दर्शक होतोच पण वडीलही होतो. त्यामुळे वाद झाले पण समाधान सकारात्मक होते.’
‘ग्रीक गॉड’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या हृतिक रोशनने आपल्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत भारतीय चित्रपट उद्योगावर अमिट छाप सोडली आहे. आपल्या शानदार अभिनय, किलर लुक आणि डान्ससाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण करून एक नवा टप्पा गाठला आहे.
संबंधित बातम्या