Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूड हॉरर चित्रपटांचा विचार केला तर रामसे ब्रदर्सचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. रामसे ब्रदर्सचा १९८८ साली आलेला 'विराना' हा चित्रपट आजही भारतीय हॉरर सिनेमातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जातो. पण चित्रपटाची मुख्य अभिनेत्री जॅस्मिन धुन्ना या चित्रपटानंतर कुठे गायब झाली, हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. अभिनेत्री बेपत्ता होण्याबाबत वेगवेगळे कयास बांधले गेले. काहींच्या मते ती जिवंत असून अमेरिकेत राहते. तर काहींचे म्हणणे आहे की, अभिनेत्री आपली ओळख बदलून मुंबईतील वर्सोवा येथे राहत आहे.
'विराना' या चित्रपटामध्ये जॅस्मिन मुख्य नायिका होती. या चित्रपटात ती एका भीतीदायक, पण अतिशय सुंदर नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटाची ही नायिका आत्म्याच्या प्रभावाखाली असल्याचे दाखवण्यात आले होती. या चित्रपटातून तिचा निरागसपणा आणि सौंदर्य प्रेक्षकांना खूप आकर्षित करत होते, पण या चित्रपटानंतर ती अचानक गायब झाली. यानंतर पुढे तिने कोणताही चित्रपट केला नाही किंवा ती कोणत्याही चित्रपटाच्या कार्यक्रमात दिसली नाही. तिच्या बेपत्ता होण्याबाबत अनेक अफवा आणि सिद्धांत होते. काही रिपोर्ट्सनुसार -
ग्लॅमर दुनियेपासून अंतर : असं म्हटलं जातं की, जॅस्मिनने स्वत: चित्रपटसृष्टीचा निरोप घेतला आणि साधं आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला.
एनआरआय म्हणून परदेशात स्थायिक : काही लोकांचा असा विश्वास आहे की, ती अमेरिका किंवा कॅनडामध्ये स्थायिक झाली आणि तिने आपली ओळख सगळ्यांपासून लपवली आहे.
अंडरवर्ल्डची भीती : ८०-९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये अंडरवर्ल्डचा बराच हस्तक्षेप होता. जॅस्मिनला एका गँगस्टरकडून ही धमकी मिळाली होती, त्यानंतर तिने इंडस्ट्री सोडल्याची चर्चा आहे.
भयपटांचा परिणाम : 'विराना'च्या यशानंतर तिला भूतपटांसाठी टाईपकास्ट करण्यात आले होते, ज्यामुळे तिला चांगल्या ऑफर्स न मिळाल्याने तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला.
'विराना' चित्रपटात काम करणाऱ्या रामसे ब्रदर्सने २०१७ मध्ये हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, आईच्या निधनानंतर जॅस्मिनने चित्रपटसृष्टीपासून स्वत:ला दूर केले होते. मात्र, स्वत: जॅस्मिनने चित्रपटांना अलविदा करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा कधीच केला नाही.
'विराना'मध्ये झळकलेला अभिनेता हेमंत बिर्जे याने आपल्या एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता की, जॅस्मिन आता चित्रपटांपासून दूर अमेरिकेत आपला व्यवसाय चालवत आहे आणि वेळोवेळी मुंबईतही येते. एक मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला होता की, ‘ती अचानक गायब झाली. काही वर्षांपूर्वी मी तिला फोन केला होता, मग दुसऱ्या दिवशी तिने मला फोन केला आणि म्हणाली की, तिने माझ्यासाठी खूप कपडे आणले आहेत, पण मी तिला भेटू शकलो नाही.’ हेमंतच्या म्हणण्यानुसार, जॅस्मिन अमेरिकेत लाइमलाइटपासून दूर आयुष्य जगत आहे.
संबंधित बातम्या