Bolllywood Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडचे चित्रपट म्हटले की, त्याच्या कथेत काहीही होणे शक्य आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एका वर्षात बॉलिवूड दिग्दर्शकांनी एकाच कथेवरून ३ चित्रपट बनवले आणि भरपूर कमाई केली. ऋषी कपूर-मनीषा कोईराला-माधुरी दीक्षित, अरबाज खान आणि नाना पाटेकर यांच्यासाठी हे तीन चित्रपट खूप लकी ठरले. बॉलिवूडचे हे तीनही चित्रपट अगदी काही महिन्यांच्या अंतरानंतर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे तिन्ही चित्रपट हॉलिवूड दिग्दर्शक जोसेफ रुबेन दिग्दर्शित 'स्लीपिंग विथ द एनिमी' या सायकॉलॉजिकल चित्रपटाचे रिमेक होते. हा चित्रपट नॅन्सी प्राइसच्या १९८७मध्ये आलेल्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित होते. चित्रपटाच्या कथेत, अभिनेत्री तिच्या मृत्यूचे नाटक करते आणि तिच्या पतीला अडकवते. ज्युलिया रॉबर्ट्स, पॅट्रिक बर्गिन आणि केविन अँडरसन यांनी या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे.
बॉलिवूडच्या दिग्दर्शकांनी ही कथा त्यांच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या स्टारकास्टसह वेगवेगळ्या शैलीत दाखवली. 'स्लीपिंग विथ द एनिमी' ही कथा पहिल्यांदा १९९५ साली दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी हिंदी भाषेत आणली होती, ज्याची निर्मिती युसूफ भट्ट आणि रीमा राकेशनाथ यांनी केली होती. त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव 'याराना' ठेवले होते. या चित्रपटामध्ये ऋषी कपूर, माधुरी दीक्षित, राज बब्बर, कादर खान आणि शक्ती कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट ४.७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनला होता आणि जगभरात ८ कोटींहून अधिक कमाई केली होती.
'याराना'च्या यशानंतर अब्बास-मस्तानने पुन्हा एकदा 'स्लीपिंग विथ द एनिमी' या कथेद्वारे प्रेक्षकांचे आपापल्या पद्धतीने मनोरंजन केले. त्यांनी आपल्या चित्रपटाचे नाव 'दरार' ठेवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा चित्रपटही त्यांनी ऋषी कपूरसोबत केला होता. यावेळी चित्रपटात माधुरीच्या जागी जुही चावला होती. हा तोच चित्रपट आहे ज्याद्वारे अरबाज खानने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. या चित्रपटाची निर्मिती सुजित कुमार यांनी केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'दरार' हा त्या काळातील हिट चित्रपट होता. हा चित्रपट ४.५० कोटी रुपयांमध्ये बनला होता आणि बॉक्स ऑफिसवर जवळपास ६ कोटींची कमाई केली होती.
पार्थो घोषने तिसऱ्यांदा 'स्लीपिंग विथ द एनिमी'ची कथा बॉलिवूडमध्ये वेगळ्या स्वरूपात आणली. १९९६मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या चित्रपटाचे नाव त्यांनी 'अग्नि साक्षी' ठेवले. या चित्रपटात नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील त्यांच्या जोडीला सर्वांनी भरभरून प्रेम दिले. चित्रपटातील जॅकी श्रॉफचा अभिनय लोकांना आवडला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, 'अग्नि साक्षी' हा चित्रपट १९९६चा ब्लॉकबस्टर हिट होता. निर्मात्याने हा चित्रपट ४ कोटी रुपयांना बनवला होता. तर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३० कोटींची कमाई केली होती. हा बॉलिवूडमधील सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक आहे.'स्लीपिंग विथ द एनिमी'चा हा तिसरा रिमेक नाना-मनीषा आणि जॅकीसाठी सर्वात नशीबवान ठरला. या चित्रपटाने तिघांच्या करिअरची दिशाच बदलून टाकली.
संबंधित बातम्या