Shyam Benegal : श्याम बेनेगल यांचे असे चित्रपट ज्यांनी समाजाला दाखवला आरसा! तुम्ही पाहिलेत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shyam Benegal : श्याम बेनेगल यांचे असे चित्रपट ज्यांनी समाजाला दाखवला आरसा! तुम्ही पाहिलेत का?

Shyam Benegal : श्याम बेनेगल यांचे असे चित्रपट ज्यांनी समाजाला दाखवला आरसा! तुम्ही पाहिलेत का?

Dec 24, 2024 11:03 AM IST

Shyam Benegal Movies : ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी भलेही या जगाचा निरोप घेतला, पण त्यांनी बनवलेल्या चित्रपटांमधून त्यांच्या स्मृती लोकांच्या मनात सदैव अजरामर राहतील.

Shyam Benegal Popular Movies
Shyam Benegal Popular Movies

Shyam Benegal Popular Movies : ज्येष्ठ हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे निधन झाले. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते देह रूपाने या जगातून गेले असले,तरी त्यांनी आपल्या कलाकृतीतून अनेक आठवणी मागे सोडल्या आहेत. 'मला भूतकाळात जगायचे नाही...' असे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते, हे त्यांच्या जीवनाचे सूत्र म्हटले तर वावगे ठरणार नाही. १४ डिसेंबर १९३४ रोजी जन्मलेल्या श्याम बेनेगल यांची विचारसरणी खूप दूरदर्शी होती. श्याम बेनेगल यांनी नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजाला आरसा दाखवला. त्यांच्या काही आयकॉनिक चित्रपटांवर एक नजर टाकूया...

अंकुर

श्याम बेनेगल यांनी १९७४मध्ये 'अंकुर' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाला सुरुवात केली. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित होता. या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. 'अंकुर'ने ४०हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. या चित्रपटात त्यांनी सरंजामशाही आणि लैंगिक छळ यांसारख्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकला होता. या चित्रपटामध्ये श्याम बेनेगल यांनी हैदराबादमध्ये घडलेली सत्य घटना चित्रपटाच्या रूपात प्रेक्षकांसमोर मांडली होती. शबाना आझमी या चित्रपटात झळकल्या होत्या.

कलियुग

महाभारतापासून प्रेरित असलेल्या 'कलियुग' या चित्रपटाच्या कथेत कलयुगातील कुटुंबांमध्ये व्यवसायावरून होणारे वैर दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात राज बब्बर, शशी कपूर, सुप्रिया पाठक, अनंत नाग, रेखा, कुलभूषण खरबंदा, सुषमा सेठ असे दिग्गज कलाकार होते. हा चित्रपट श्याम बेनेगल यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक होता.

Shyam Benegal Death: 'समांतर' सिनेमाचे जनक, दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

भूमिका

श्याम बेनेगल यांचा 'भूमिका' हा चित्रपट एका प्रसिद्ध अभिनेत्रीची कथा प्रेक्षकांसमोर मांडतो. तिच्या आयुष्यात पुरुष कसे येतात आणि तिच्या आयुष्यात अनेक बदल घडतात, हे यात दाखवण्यात आले आहे. हा श्याम बेनेगल यांच्या सर्वोत्कृष्ट आणि प्रभावशाली चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये अमोल पालेकर, स्मिता पाटील, अनंत नाग, अमरीश पुरी आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

मंडी

श्याम बेनेगल यांचा हा चित्रपट समाजातील त्या महिलांची कथा आहे, ज्या उदरनिर्वाहासाठी आपले शरीर विकतात. कथेचा संबंध वेश्यालयाशीही होता. शबाना आझमी, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते. लोक गणिकांनच्या या व्यवसायाला कशी नावं ठेवतात, आणि स्वतःच तिथे येतात. हा चित्रपट समाजाचा हा चेहरा समोर आणतो. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

झुबैदा

श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट एक वेगळी प्रेमकथा दाखवणारा आहे. आजही या चित्रपटाची खूप चर्चा होते. करिश्मा कपूरच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये त्याची गणना होते. या चित्रपटात करिश्मासोबत मनोज बाजपेयी आणि रेखाही महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. चित्रपटात, जुबैदा (करिश्मा कपूर) आणि महाराजा विजेंद्र सिंह (मनोज बाजपेयी) एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र त्यांची ही प्रेम कथा वाटते तितकी साधी नाही.

Whats_app_banner