Rajkumar Santoshi News : चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. चेक बाऊन्स प्रकरणी जामनगर कोर्टाने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 'घातक' आणि 'घायल' सारखे सुपरहिट चित्रपट देणारे सुप्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांना जामनगर न्यायालयाने शनिवारी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांना २ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. चेक बाऊन्स प्रकरणात न्यायालयाने ही शिक्षा दिली आहे. याशिवाय, न्यायालयाने निर्माते राजकुमार संतोषी यांना बाऊन्स झालेल्या धनादेशाच्या दुप्पट म्हणजेच २ कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता राजकुमार संतोषी यांनी जामनगरचे व्यापारी अशोक लाल यांच्याकडून १ कोटी रुपये उसने घेतले होते. पण, नंतर त्यांनी ती रक्कम परत केली नाही. तर, दिलेले चेक देखील बाऊन्स झाले. त्यामुळे अशोकलाल यांनी जामनगर न्यायालयात निर्मात्याविरुद्ध खटला दाखल केला होता. या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने राजकुमार संतोषी यामा हा मोठा दंड आणि शिक्षा सुनावली आहे.
राजकुमार संतोषी यांचे हे संपूर्ण प्रकरण २०१५ मधील आहे. २०१९मध्ये जामनगर कोर्टाने राजकुमार संतोषी यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. आदेशानंतर निर्मातेही न्यायालयात हजर झाले होते. यानंतर अशोकलालच्या वकिलाने म्हटले होते की, राजकुमार संतोषी आणि अशोकलाल खूप चांगले मित्र आहेत. २०१५ मध्ये अशोकलालने राजकुमार संतोषी यांना एक कोटी रुपये दिले होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी संतोषी यांनी त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे १० धनादेश दिले होते. मात्र, डिसेंबर २०१६मध्ये हे धनादेश बाऊन्स झाले.
रिपोर्टनुसार, वकिलाने पुढे सांगितले की, चेक बाऊन्स झाल्यानंतर अशोक लाल यांनी राजकुमार संतोषी यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतरच अशोकलाल यांनी राजकुमार संतोषी यांच्याविरोधात जामनगर न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणाची नोंद झाल्यानंतर १८ सुनावणीत राजकुमार संतोषी न्यायालयात हजर राहिले नाहीत.
चेक बाऊन्स झाल्यानंतर जामनगर कोर्टाने अशोकलाल यांना १५ हजार रुपये देण्याचे आदेश राजकुमार संतोषीना दिले होते. मात्र, आता कोर्टाने गंभीर निकाल देत अशोक लाल यांना घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट रक्कम परत करण्याचे आदेश दिले आहेत. राजकुमार संतोषी हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. ‘दामिनी’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘खाकी’, ‘घातक’ आणि ‘घायाल’ यासह अनेक सुपरहिट चित्रपट त्यांनी केले आहेत.
संबंधित बातम्या