Fighter Box Office Collection Day 10: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाच्या कमाईने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. रिलीजच्या दुसऱ्या शनिवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘फायटर’ या चित्रपटाचं कथानक लोकांना आवडताना दिसत आहे. ‘फायटर’ हा चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशनचे चाहते थिएटरमध्ये जाताना दिसत आहेत. ‘फायटर’ बॉक्स ऑफिसवर सातत्याने करोडोंचा व्यवसाय करताना दिसत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
‘फायटर’ चित्रपटातील दीपिका आणि हृतिकच्या केमिस्ट्रीचीही खूप चर्चा होत आहे. या चित्रपटात हे दोन्ही सुपरस्टार पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसले आहेत. हृतिक रोशनने त्याच्या या पात्रासाठी खूप मेहनत घेतली आहे. विशेषत: अभिनेत्याने अनेक महिन्यांपासून त्याच्या फिटनेसवर काम केले आहे. हृतिकने चित्रपटातील व्यक्तिरेखेत चपखल बसण्यासाठी मिठाई खाणे देखील सोडले होते. त्याचबरोबर दीपिकाने चित्रपटातील अनेक दृश्यांसाठी खूप मेहनत घेतली आहे.
दरम्यान, दुसरा वीकेंड सुरू होताच निर्मात्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पाहायला मिळत आहे. आठवड्याच्या मधल्या काही दिवसांमध्ये ‘फायटर’चे कलेक्शन घसरले होते. मात्र, शनिवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आहे. चित्रपटाने आदल्या दिवशी शुक्रवारच्या तुलनेत दुप्पट कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या कलेक्शन रिपोर्टनुसार, ‘फायटर’च्या दहाव्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडे १०.५ कोटी आहेत. ‘फायटर’ने चित्रपटगृहांमध्ये आणि कलेक्शनमध्ये पुन्हा एकदा वेग पकडला आहे. शुक्रवारी या चित्रपटाने ५.७५ कोटींची कमाई केली होती.
‘फायटर’ने दहाव्या दिवशी कमाईच्या बाबतीत सलमान खानच्या ‘टायगर ३’ला मागे टाकले आहे. ‘टायगर ३’ने रिलीजच्या १०व्या दिवशी ६.३५ कोटींची कमाई केली होती. अर्थात ही कमाई ‘फायटर’पेक्षा खूपच कमी आहे. आता हृतिक आणि दीपिकाच्या फायटरचे एकूण कलेक्शन १६२.७५ कोटी झाले आहे. तर, आता रविवारच्या बॉक्स ऑफिस कलेक्शन आकडेवारीवरून आणखी चांगल्या निकालांची अपेक्षा आहे. या चित्रपटाला सुट्टीचा खूप फायदा होऊ शकतो.
‘फायटर’ या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यात मुख्य भूमिकेमध्ये दिसले आहेत. यासोबतच अनिल कपूर, करण सिंह ग्रोवर आणि संजीदा शेख यांच्याही या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी एअरफोर्स पायलट्सची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या कथानकात भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध दाखवण्यात आले आहे.
संबंधित बातम्या