Feroz Khan Birth Anniversary: आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते म्हणजे फिरोज खान. ते बॉलिवूडमधील इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळे ठरले आहेत. त्यांचा जीवन जगण्याचा, जीवनाचा आनंद घेण्याचा फंडा हा अतिशय वेगळा होता. ७०च्या दशकात फिरोज खान हे स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. अनेकदा फिरोज खान यांची तुलना हॉलिवूड कलाकारांसोबत केली जात असे. आज २५ सप्टेंबर रोजी फिरोज खान यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी...
फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ मध्ये पठाण परिवारामध्ये झाला होता. लहानपणापासूनच फिरोज यांना अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी मिळेल ती भूमिका साकारली. कधी ते चॉकलेट हिरोच्या भूमिकेत दिसले तर कधी भयानक खलनायकाच्या. फिरोज यांची लोकप्रियता सातासमुद्रापार असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, या दरम्यान पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. २००६मध्ये अभिनेते फिरोज खान 'ताजमहाल' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानात गेले होते. मात्र, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना ब्लॅक टाकल्याचे म्हटले जाते. फिरोज खान यांनी एका पाकिस्तानी गायकावर टीका करण्यासोबतच, पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले होते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, असे म्हणत अभिनेते फिरोज खान यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.
फिरोज खान हे कायम खासगी आयुष्यामुळे देखील चांगलेच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी १९६५ साली सुंदरीशी लग्न केले होते. पण त्यांचे नाते फारकाळ टिकले नाही. कारण फिरोज खान हे काही दिवसांनंतर हवाई सुंदरी ज्योतिका धनराजगिरी यांच्या प्रेमात पडले. फिरोज खान आणि ज्योतिका यांच्या रिलेशनच्या त्यावेळी फार चर्चा रंगल्या होत्या. ज्योतिका ही राजा महेंद्र धनराजगिर यांची मुलगी होती. ज्योतिकासाठी फिरोज यांनी सुंदरीला १९८५ साली घटस्फोट दिला. त्यानंतर ज्योतिका आणि फिरोज हे लिव्हइनमध्ये राहू लागले. ज्योतिकाला फिरोज यांच्याशी लग्न करायचे होते. पण फिरोज सतत टाळाटाळ करत असल्याचे लक्षात येताच ज्योतिकाने ब्रेकअप केला.
वाचा: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; 'फुलवंती'मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
काही दिवस एकटे राहिल्यानंतर फिरोज हे पुन्हा पत्नी सुंदरीकडे गेले. मात्र, सुंदरीने त्यांचा स्वीकार केला नाही. पण फिरोज आणि सुंदरी यांना दोन मुले आहेत. फरदीन खान आणि लैला २००७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वेल्कम’ हा चित्रपट फिरोज यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला. त्यांनी २७ एप्रिल २००९ साली जगाचा निरोप घेतला. त्यावेळी ते ६९ वर्षांचे होते.