Shilpa Shirodkar Farah Khan : सध्या ‘बिग बॉस १८’मध्ये खूप ड्रामा पाहायला मिळत आहे. स्पर्धकांचे खरे चेहरे आता लोकांसमोर येत आहेत. ते अनेकदा भांडताना दिसतात आणि क्षणार्धात त्यांची मैत्रीही होते. या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानची जागा दिग्दर्शिका फराह खान हिने घेतली होती. फराहने ‘वीकेंड का वार’ला येऊन स्पर्धकांची खूप शाळा घेतली. यादरम्यान, शिल्पा शिरोडकर हिने फराहचा एक किस्सा सांगितला. शिल्पाने खुलासा केला की, तिला ‘छैय्या छैय्या’ गाण्याची ऑफर देण्यात आली होती. पण, नंतर फराहने तिला रिजेक्ट केलं.
रविवारच्या एपिसोडमध्ये शिल्पाने करणवीर आणि चुमला ‘छैय्या-छैय्या’ गाण्याबद्दलचा हा किस्सा सांगितला. त्यांच्या या चर्चेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पाने हसत हसत सगळ्यांना तिच्या या गाण्याबद्दलचा किस्सा सांगितला.
फराह खानचा हा किस्सा सांगताना शिल्पा शिरोडकर म्हणाली की, ‘छैय्या छैय्या’ या गाण्यासाठी आधी तिला विचारणा झाली होती. मात्र, फराहने तिला या गाण्यासाठी वजन कमी करण्यास सांगितले होते. इतकंच नाही तर त्यासाठी वेळ देखील दिला होता. मात्र, १०-१५ दिवसांनंतर, फराह शिल्पाकडे आली आणि म्हणाली की, ‘तू गाण्यासाठी खूप जाड आहेस.’ यानंतर शिल्पा शिरोडकरला या गाण्यातून डच्चू देऊन, तिच्या ऐवजी मलायकाला या गाण्यात घेण्यात आले.
शिल्पा शिरोडकर हिने हा किस्सा आपले जवळचे मित्र चुम दरांग आणि करणवीर मेहरा यांच्यासोबत शेअर केला. यावेळी शिल्पाचं बोलणं ऐकून करणवीर मेहराने तिची खिल्ली देखील उडवली. तो हसत म्हणाला की, ‘तुम्ही ट्रेनमध्ये चढला असता, तर काय झालं असतं, ट्रेन थांबली असती की काय?’ यावर उत्तर देताना शिल्पा म्हणाली की, ‘आता मला काय माहीत, फराह आणि मणी सरच याबद्दल सांगू शकतात.’ त्यानंतर करणवीर म्हणाला की, ‘जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. तू खूप चांगले चित्रपट केले आहेस आणि कदाचित ते गाणे मलायकापेक्षा चांगले कोणी करू शकले नसते.’
‘छैय्या छैय्या’ हे गाणे शाहरुख खानच्या ‘दिल से’ या चित्रपटातील आहे . हे गाजलेले गाणे सुखविंदर सिंह यांनी गायले आहे. या गाण्यात मलायका आणि शाहरुख खान यांनी ट्रेनच्या छतावर चढून धमाकेदार डान्स केला होता. शाहरुख-मलायकाचे हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
संबंधित बातम्या