छोट्या पडद्यावरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. या मालिकेच्या हटके कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीच उतरली होती. नेत्रा, विरोचक, त्रिनयनादेवी, रूपाली, आस्तिका या पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. हिंदी मनोरंजन विश्वात ज्या प्रकारे ‘नागिन’ या मालिकेला लोकप्रियता मिळाली होती, तितकीच लोकप्रियता ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मराठी मालिकेला मिळत होती. मात्र, सध्या या मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे प्रेक्षक चांगलेच संतापलेले दिसत आहेत.
नुकताच या मालिकेचा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये रूपाली म्हणजेच विरोचक राजाध्यक्ष कुटुंबाला नेत्रा, अद्वैत आणि इंद्राणीवर हल्ला करायला सांगते. तर, विरोजकाच्या अंमलाखाली असलेल्या राजाध्यक्ष कुटुंबाने नेत्रा आणि तिच्या नवऱ्यावर हल्ला देखील केला आहे. यामध्ये नेत्रा जखमी होते. मात्र, या नवीन ट्विस्टचा प्रोमो प्रेक्षकांना अजिबातच आवडलेला नाही. या प्रोमोच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांनी आपला राग व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सध्या या मालिकेत उगाचच काहीही दाखवत असल्याचे, प्रेक्षकांचे म्हणणे आहे. शिकल्या सवरलेल्या घरातील ही लोकं इतकं बिनडोक कसं काय वागू शकतात?, असा प्रश्न प्रेक्षक विचारताना दिसत आहेत. या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रेक्षकांनी कमेंट्स माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका प्रेक्षकाने लिहिलं की, ‘खरंच विरोचक किती बरोबर बोलतोय... त्रिनयना देवीच्या मूर्ख लेकी... आणि बावळट राजाध्यक्ष... या तिघांना माहिती आहे की, सगळे विरोचकाच्या वशमध्ये आहेत. तरी मूर्खासारखे प्रश्न विचारत असतात त्यांना.. ही कुठे गेली... तो कुठे गेला... किती बावळटपणा आहे. कालचा आणि परवाचा एपिसोड तर अतिशय बावळटपणाचा दाखवला. एवढा वेळ मूर्ख बनवलं विरोचकाने, तरी अक्कल आली नाही अजून यांना... सारखा विरोचक त्यांना मूर्ख बनवत असतो... खरं कौतुक तर विरोचकाचेच आहे.’
तर, आणखी एकाने लिहिले की, ‘तुम्ही प्रेक्षकांची मेंटल हॅरेसमेंट करत आहात. खरी नेत्रा कोण यात एक महिना घालवला. पण, लंडन वरून आलेल्या अद्वैतला डीएनए टेस्ट करायचे सुचले नाही. या सीरिअलचा सुरुवातीचा कन्सेप्ट खरा छान होता. पण आता प्रेक्षकांची सहनशीलता संपली. प्रोमोजमुळे उत्कंठा वाढत नाही, पण तणाव वाढतो. सर्व सुजाण प्रेक्षकांनी ज्या कमेंट्स केल्या आहेत त्याचा आदर करा.’ दुसऱ्या एकाने लिहिले की, ‘मूर्खपणा बंद करा आणि संपवा आता ही मालिका. थिल्लरपणा चालू केला तुम्ही देवीच्या नावानी.. चेष्टा करताय.’ अशाच प्रकारच्या कमेंट्स सध्या पाहायला मिळत आहेत.