नुकतीच ‘बिग बॉस मराठी’च्या सीझन ५ची घोषणा झाली. प्रेक्षक या नव्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीने याची घोषणा करताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, या आनंदासोबतच सगळ्या प्रेक्षकांना एक धक्का देखील बसला. यावेळी महेश मांजरेकर ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालन करणार नाहीत. तर, प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख हा यावेळी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. नुकताच ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५चा एक नवा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये रितेश देशमुख याची झलक पाहायला मिळाली. मात्र, आता प्रेक्षक महेश मांजरेकर यांची आठवण काढताना दिसत आहेत.
‘बिग बॉस मराठी’ म्हटलं की डोळ्यासमोर येणारा पहिला चेहरा हा महेश मांजरेकर यांचाच असायचा. मात्र, यावेळी ‘बिग बॉस मराठी’मधून महेश मांजरेकर यांचा पत्ता कट झाला आहे. यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या नव्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ची घोषणा करताना शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता रितेश देशमुख याने निळ्या रंगाचा सूट घातला आहे. तर, त्याच्या टाय पिनवर बिग बॉसच्या डोळ्याचं डिझाईन दिसत आहे. ‘मराठी मनोरंजनाचा “BIGG BOSS”, सर्वांना ”वेड” लावायला येतोय... “लयभारी”होस्ट, सुपरस्टार रितेश देशमुख!! फक्त कलर्स मराठीवर आणि @officialjiocinema वर’, असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
मात्र, या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये आता प्रेक्षक आणि चाहते महेश मांजरेकर यांची आठवण काढताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करून रितेश देशमुख याचं स्वागत केलं आहे. मात्र, काही लोक अजूनही महेश मांजरेकर हवे होते, असे म्हणत आहेत. या टीझर व्हिडीओवर कमेंट करत एका युजरने लिहिले की, ‘मिसिंग महेश मांजरेकर सर, पण रितेश देशमुखचं वेलकम’. आणखी एकाने लिहिले की, ‘मला माहित आहेत, सगळ्यांनाच महेश मांजरेकर सरांची आठवण येत आहे. पण बघूया रितेश देशमुख हा शो कसा होस्ट करतो. बघितल्याशिवाय काहीच बोलायचं नाहीये. पण आनंद होतोय की बिग बॉस मराठी परत आलाय.’
सोशल मीडियावर अशाच वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ‘महेश मांजरेकर सर बेस्ट एव्हर’, ‘आतुर झालो आहोत, पण महेश मांजरेकर सर हवेच होते’, ‘आम्हाला महेश मांजरेकर सर हवे आहेत’, ‘महेश मांजरेकर हेच योग्य आहेत मराठी बिग बॉससाठी’, ‘महेश मांजरेकर नाहीत, तर आता स्पर्धकांवर रागवणार कोण?’ अशा कमेंट्स या व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या