छोट्या पडद्यावरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका सध्या एका वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे नुकताच मालिकेत एक मोठा लीप पाहायला मिळाला. अप्पी आणि अर्जुन आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, वेगवेगळ्या वाटांवर पोहोचले आहेत. कधीकाळी एकमेकांचा जीव असणारे अप्पी आणि अर्जुन आता एकमेकांपासून दूर वेगवेगळ्या प्रदेशात राहत होते. मात्र, नियतीचा खेळ असा झाला की, पुन्हा एकदा दोघांची भेट झाली. तब्बल सात वर्षानंतर एकमेकांसमोर आलेले अप्पी आणि अर्जुन आजही आपलं वैर विसरलेले नाहीत. दरम्यान, दोघांचा मुलगा आता सात वर्षांचा झाला आहे. नकळत का होईना अमोल आणि अर्जुनची भेट झाली असून, दोघांमध्ये छान मैत्री देखील झाली आहे.
मात्र, अमोलने स्वतःचं नाव सिंबा सांगितलं असल्याने अर्जुनला तो आपला मुलगा असल्याची कल्पना नाहीये. दुसरीकडे, अर्जुन अप्पीकडे आपल्या मुलाबद्दल म्हणजेच अमोलबद्दल विचारणा करतो. मात्र, ती त्याला अमोलबद्दल काहीही सांगण्यास नकार देते. त्यामुळे अर्जुन तिच्यावर आणखीच चिडला आहे.
दुसरीकडे, अपर्णा आणि अर्जुनी यांनी आता एकमेकांशी बोलावं असा सल्ला गायतोंडे त्यांना देतात. या सल्ल्यावरून अर्जुन अप्पीशी बोलण्यासाठी तिच्या घरापर्यंत जाणार आहे. मात्र, तिच्या घराबाहेर सरकार यांना बघून आता अर्जुन आणखीनच चिडणार आहे. सध्या मालिकेचे नवीन प्रोमो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. आता या मालिकेवर प्रेक्षक आणि चाहते चांगले चिडलेले दिसत आहेत. सात वर्षांच्या लीप नंतरही मालिकेच्या कथानकात काही चांगला बदल झाला नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. या मालिकेच्या व्हायरल प्रोमोच्या खाली प्रेक्षक कमेंट करत ‘ही मालिका आता बंद करा... रटाळवाणी झाली आहे’, असं म्हणताना दिसत आहेत.
या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करते एका नेटकाऱ्याने म्हटलं की, ‘बंद करून टाका ही मालिका’. तर, दुसऱ्या एकाने म्हटलं की, ‘दाखवण्यासारखं काहीही नसेल, तर बंद करा. एवढ्या मोठ्या हुद्द्यावर असणारे अधिकारी असे बिनडोक वागत नाहीत.’ आणखी एकाने कमेंट करत म्हटले की, ‘एक पोलीस आणि एक कलेक्टर दाखवलेत. तेवढे शिक्षण असतानाही विचार तेच जुनाट आणि रटाळ... ही मालिका बंद करा. उगाच काहीही दाखवू नका.’ अशाच प्रकारच्या अनेक कमेंट्स या प्रोमोवर पाहायला मिळत आहेत.
संबंधित बातम्या