Anuradha Paudwal Join BJP: प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल (Anuradha Paudwal) यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. आज (१६ मार्च) सकाळी अनुराधा पौडवाल राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पोहोचल्या होत्या. याच ठिकाणी भाजपने पत्रकार परिषद घेऊन, अनुराधा पौडवाल यांच्या पक्ष प्रवेशाची घोषणा केली. भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत अनुराधा पौडवाल यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या की, ‘आज मी सनातन धर्माशी सखोल संबंध असलेल्या पक्षात प्रवेश करणार आहे, याचा मला खूप आनंद होत आहे. ३५ वर्षे चित्रपटसृष्टीत गाणी गायल्यानंतर मी फक्त भक्तीगीते गाण्याचा निर्णय घेतला. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेदरम्यान मला तिथे ५ मिनिटे गाण्याची संधी मिळाली. हे माझे आयुष्यातील मोठे स्वप्न होते. आणि आता मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, हे माझे भाग्य आहे.’
गोड गळ्याची गायिका अशी ओळख असणाऱ्या अनुराधा पौडवाल यांनी अनेक लोकप्रिय हिंदी गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अनुराधा पौडवाल यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९५४ रोजी मुंबईत झाला. १९७३मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अनुराधा यांनी हिंदी आणि मराठीसह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या सुरांची जादू दाखवली आहे. याशिवाय अनुराधा पौडवाल यांची भक्तिगीते आणि भजने आजही लोकांच्या पसंतीस उतरलेली आहेत. २२ जानेवारी रोजी अयोध्येत झालेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात त्या भजन गाताना दिसल्या होत्या. यावेळी त्यांनी 'रघुपती राघव राजा राम' गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
अनुराधा पौडवाल भाजपमध्ये दाखल झाल्याची बातमी ऐकताच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. आता पक्ष प्रवेश केल्यानंतर अनुराधा पौडवाल भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भाजप किंवा अनुराधा पौडवाल यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. अनुराधा पौडवाल लोकसभा निवडणूक लढवणार का? आणि लढवली तर कोणत्या जागेवरून लढणार? या बाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. सध्या, अनुराधा पौडवाल सार्वत्रिक निवडणुकीत सहभागी होणार नाहीत, असे म्हटले जात आहे. मात्र, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा पौडवाल यांच्याकडे भाजपच्या स्टार प्रचारक म्हणून पाहिले जात आहे.