'डान्सिंग गुरू' म्हटले की, प्रत्येकाच्या ओठावर एकच नाव येते, ते म्हणजे प्रभू देवा. त्याला 'भारताचा मायकल जॅक्सन' देखील म्हटले जाते. प्रभू देवाने वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला तो बॅकग्राउंड डान्सर होता. पण, काही वर्षातच तो देशातील टॉप डान्स कोरिओग्राफर आणि अभिनेता बनला. प्रभू देवाचे वडील साऊथ चित्रपटांमध्ये डान्स मास्टर असतानाही त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. एकदा प्रभुदेवांना अर्धांगवायू झाला होता. त्याच्या शरीरातील हालचाल थांबली होती. मात्र, यावरही त्याने मात केली.
प्रभू देवाने कुठूनही नृत्याचे अधिकृत प्रशिक्षण घेतले नाही. त्याने वडिलांसोबत नृत्य करून आणि स्वतः सराव करून डान्स स्टेप्स तयार केल्या. प्रभू देवाचा जन्म ३ एप्रिल १९७३ रोजी म्हैसूर येथे झाला. त्याचे वडील मुगुर सुंदर हे डान्स कोरिओग्राफर होते. वडिलांकडून प्रेरणा घेऊन प्रभू देवाने नृत्यात रस घेण्यास सुरुवात केली. प्रभू देवाला नाचताना पाहून सर्वजण थक्क व्हायचे. नंतर प्रभू देवाने भरतनाट्यम आणि काही पाश्चात्य शैलीतील नृत्यप्रकार शिकून घेतले. यानंतर प्रभू देवाने चित्रपटांमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून सुरुवात केली. १९८६मध्ये आलेल्या ‘मौना रागम’ या तमिळ चित्रपटात तो पहिल्यांदा बासरी वाजवणाऱ्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. यानंतर एका चित्रपटात तो बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसला.
प्रभू देवाला १९८९मध्ये कमल हासनच्या ‘वेत्री विझा’ या चित्रपटातून कोरिओग्राफर म्हणून संधी मिळाली. यानंतर प्रभुदेवांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. तेव्हापासून प्रभू देवाने १००हून अधिक चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले आहे. नृत्यदिग्दर्शनानंतर प्रभू देवाने अभिनयातही पदार्पण केले आणि वेगळी छाप सोडली. प्रभू देवाच्या करिअरची सुरुवात वयाच्या १५व्या वर्षी झाली. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अशी संधी किंवा क्षण येतो जो व्यक्तीसाठी 'ट्रिगर शॉट' म्हणून काम करतो. प्रभू देवाच्या आयुष्यात हा क्षण ११वीत नापास झाल्यावर आला. ११वीत नापास झाल्यावर, त्याला ओरडण्याऐवजी त्याच्या वडिलांनी त्याच्या पाठीवर थाप मारली आणि तुला जे हवं ते कर. वडिलांच्या याच पाठिंब्यामुळेच प्रभू देवा हा देशाचा मोठा डान्स कोरिओग्राफर आणि 'डान्सिंग गुरू' बनला.
'तुतक तुतक तुतिया' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान प्रभू देवाला अर्धांगवायू झाल्यामुळे २०१६ हे वर्ष त्याच्यासाठी खूप अडचणीचे ठरले. प्रभू देवा एका गाण्याच्या शूटिंग दरम्यान नाचत असताना एका स्टेप दरम्यान त्याला अचानक अर्धांगवायू झाला. त्यावेळी प्रभू देवाला शरीरही हलवता येत नव्हते. काही समजण्यापूर्वीच तो जमिनीवर पडला. त्यानंतर प्रभू देवाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्याला तात्पुरता अर्धांगवायू झाला होता, जो स्नायूंच्या ताणामुळे झाला होता. मात्र, यावरही त्याने मात केली.