बॉलिवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची अशी वेगळी ओळख करणारी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ती एक उत्कृष्ट डान्सर म्हणून देखील ओळखली जाते. नुकताच तिची 'लुटेरे' ही वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे. त्यानिमित्ताने तिने 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राजकारणात प्रवेश करणार की नाही यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अमृता खानविलकरला मुलाखतीमध्ये 'लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. अनेक कलाकारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. भविष्यात तुला राजकारणात प्रवेश करायला आवडेल का' असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अमृताने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अमृताने थेट राजकारणात प्रवेश करायला नकार दिला. भविष्यातही तिला कधी राजकारणात प्रवेश करायला आवडणार नाही असे ती स्पष्टच म्हणाली आहे.
वाचा: देवीच्या मंदिरात जुळणार आकाश आणि वसूमध्ये सूत? 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नवा ट्विस्ट
'नाही. मला राजकारणात जरा ही रस नाही. मी कधी येणार पण नाही. हा माझ्या आवडीचा विषय नाही. मला त्यावर चर्चा करायला पण आवडत नाही. मला या विषयावर बोलता ही येत नाही. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत त्यांना राजकारणात रस आहे. पण बोलायला आणि चर्चा करायला. मला या सगळ्यात बाहेरची असल्याचे वाटते. मला असं होतं की बापरे मी कुठे राहाते. मला कधी काही माहितीही नसतं आणि जाणून पण घ्यायचं नसतं. मी माझ्या जगात, मी माझ्या शिक्षणात, मी माझ्या आयुष्यात, माझ्या लोकांमध्ये खूप व्यस्त असते. मला दुसऱ्यांचं काही पडलेले नाही' असे अमृता म्हणाली.
वाचा: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये सहभागी व्हायचे? मग ही बातमी नक्की वाचा
काल हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते गोविंदा आहुजा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. गोविंदा यांना उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. गोविंदा हे अमराठी असले तरी त्याचे संपूर्ण बालपण हे विरारमध्ये गेले आहे. त्यामुळं ते अस्खलित मराठी बोलताना दिसतात. जवळपास सर्व भाषिकांना ते आपले वाटतात. त्याच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध होण्याची शक्यता दिसत नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांची देखील भेट त्यांनी घेतली होती.