Ashok Saraf Injured During Shooting : मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वालाही आपलं वेद लावणारे मारठमोळे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट, नाटकं आणि मालिका दिल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचा साक्षात्कार विविध माध्यमांतून प्रेक्षकांना होत राहिला आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी छोट्या पडद्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आपला जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
अशोक सराफ यांची ‘अशोक मा. मा.’ ही नवी मालिका २५ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेने प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळवला आहे. या मालिकेची घोषणा काही महिन्यांपूर्वीच करण्यात आली होती, आणि प्रोमो देखील सोशल मीडियावर शेअर केला गेला होता. या नव्या भूमिकेतही अशोक सराफ यांना अभिनयासाठी खूप प्रेम मिळत आहे. या मालिकेच्या निमित्ताने अशोक मामा अनेक वर्षांनी मालिकांमध्ये कमबॅक करत आहेत.
‘अशोक मा. मा.’ या मालिकेचे शूटिंग करत असताना अशोक सराफ यांना मोठी दुखापत झाली होती. तरीही, त्यांनी प्रेक्षक आणि अभिनयावरच्या त्यांच्या निस्सीम प्रेमामुळे शूटिंग अजिबात थांबू दिलं नाही. नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत, अशोक सराफ यांनी याबद्दल खुलासा केला. ‘अशोक मा. मा.’ मालिकेच्या निमित्ताने अशोक सराफ आणि त्यांची पत्नी निवेदिता सराफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता.
अशोक सराफ यांनी त्यांच्या दुखापतीच्या प्रसंगाबद्दल सांगताना म्हटलं की, ‘या मालिकेचं शूटिंग करत असताना मी पडलो आणि त्यामुळे बरगडी फ्रॅक्चर झाली. आपटल्यामुळे एका बरगडीला फ्रॅक्चर आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेला होता. तरीसुद्धा, मी शूटिंग पूर्ण केलं. शूटिंग करताना मला दुखतंय हे समजलंच नाही, पण नंतर शरीराने सांगितलं की, काहीतरी चुकलं आहे.’ अशोक सराफ यांचे हे अथक परिश्रम आणि निस्सीम काम करण्याचं धोरण पाहून प्रेक्षकांनाही त्यांचा अभिमान वाटतो.
यावेळी अशोक सराफ म्हणाले की, ‘वयाच्या ७७ व्या वर्षीही काम करण्याची एनर्जी म्हणजे प्रेक्षक आहेत. त्यांचे प्रेम, त्यांचे कौतुक, आणि त्यांच्या प्रतिक्रिया हीच माझ्यासाठी काम करण्याची खरी एनर्जी आहे. मी जे काही करत असतो, ते प्रेक्षकांना आवडतं, आणि तेच मला पुढे काम करण्यासाठी प्रेरणा देतं.’
‘अशोक मा. मा.’ या मालिकेच्या शूटिंग दरम्यान अशोक सराफ यांनी जे परिश्रम घेतले, ते त्यांची अभिनयाप्रति असलेली निष्ठा आणि प्रेम दर्शवतात. नुकतीच सुरू झालेली ‘अशोक मा. मा.’ ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
संबंधित बातम्या