‘बिग बॉस ओटीटी २’ विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव काही दिवसांसाठी तुरुंगातून जामिनावर बाहेर आला आहे. मात्र, आता त्याच्यावर पुन्हा एकदा एफआयआरची टांगती तलवार आहे. याआधी त्याला रेव्ह पार्टीदरम्यान सापाचे विष पुरवल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले होते. नोएडा पोलिसांनी त्याला अटक करून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र, जामिनावर एल्विश ६ दिवसांत तुरुंगातून बाहेर आला असला तरी आता त्याच्या अडचणी पुन्हा वाढू शकतात. गुरुग्राम कोर्टाने 'राव साहेबां'विरोधात आणखी एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ३२ बोर गाण्याच्या शूटिंगदरम्यान सापांचा वापर केल्याप्रकरणी एल्विश यादववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गाण्याच्या शूटिंग दरम्यान युट्युबरने त्याच्या गळ्यात साप घातला होता. या प्रकरणी ‘पीपल फॉर ॲनिमल्स’ या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने एल्विशच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्ते सौरभ गुप्ता यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा आणि प्राण्यांवर क्रूरता कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती.
या प्रकरणावर सुनावणी करताना २८ मार्च रोजी गुरुग्राम कोर्टाने बादशाहपूर पोलिस स्टेशनला एल्विश यादवविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात हरियाणवी गायक राहुल यादव फाजिलपुरियाचेही नाव पुढे आले आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा हे गाणे शूट केले जात होते, तेव्हा राहुल फाजिलपुरिया देखील तिथे उपस्थित होता. पोलिस त्याच्याविरुद्ध एफआयआरही नोंदवणार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी मनोज राणा यांनी केली आहे. त्यांनी एल्विश यादव आणि राहुल यादव फाजिलपुरिया यांच्याविरुद्ध पशु क्रूरता कायदा, वन्यजीव कायदा, जुगार कायदा आणि गुन्हेगारी कट या कलमान्वये बादशाहपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
एल्विश यादव याला रेव्ह पार्टीमध्ये सापाचे विष पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. जामीन मिळवून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर, एल्विश त्याच्या सामान्य आयुष्यात परतला आहे. तो पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. नुकतीच एल्विश यादवने सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली होती. याशिवाय त्याने ब्लॉगही शेअर केला होता. यामध्ये तो आपल्या चाहत्यांसोबत होळी साजरी करण्यासाठी सूरतला पोहोचला होता.