Ekta Kapoor News : टीव्ही क्वीन, निर्माती एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस लवकरच दोघींना या संदर्भात नोटीस बजावणार आहेत. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. लवकरच आरोपींना नोटीस बजावून तपास यंत्रणांसमोर हजर राहण्यास सांगितले जाईल, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्यावर त्यांच्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या 'गंदी बात' या वेब सीरिजमध्ये अल्पवयीन मुलींचे आक्षेपार्ह सीन चित्रित केल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी टेलिफिल्म लिमिटेड, एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात मुंबईतील एमएचबी पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम २९५-ए, आयटी अॅक्ट आणि पॉक्सो कायद्याच्या कलम १३ आणि १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासोबतच या वेब सीरिजवर धार्मिक भावना दुखावल्याचा ही आरोप आहे. बोरिवलीतील एमएचबी पोलीस ठाण्याने वेब सीरिजमध्ये सिगारेटच्या जाहिराती वापरून महापुरुष आणि संतांचा अपमान केल्याचा आरोपही एका स्थानिक रहिवाशाने केला आहे.
२०२०मध्ये या सीरिजमुळे एकता कपूरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर एकता कपूरवर 'गंदी बात'च्या एका सीझनमध्ये लष्कराविरोधात आक्षेपार्ह मजकूर दाखवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी देखील बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील एका न्यायालयाने एकता आणि शोभा यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.
पोक्सो कायद्यांतर्गत लहान मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यानुसार वेगवेगळ्या गुन्ह्यांसाठी वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने पोर्नोग्राफीसाठी मुलाचा वापर केल्यास त्याला पाच ते सात वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. जर या प्रकरणातील पोक्सो अंतर्गत पीडितांचे जबाब नोंदवले गेले असतील आणि हे आरोप तपासात खरे ठरले तर एकता कपूरवर POCSO कायद्याच्या कलम १४ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल. पोर्नोग्राफिक सामग्रीसाठी अल्पवयीन व्यक्तीचा वापर केल्यास ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. यामध्ये दंडही आहे. अशा प्रकरणांमध्ये पुन्हा आढळल्यास, ७ वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. कारण अशा वेळी अल्पवयीन मुलीचे आक्षेपार्ह पद्धतीने चित्रीकरण करणे किंवा तिचा घाणेरडा व्हिडीओ बनवणे हे लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येईल. अशा परिस्थितीत आरोपीला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
संबंधित बातम्या