Dunki Breaks Record On Netflix: गेलं वर्ष शाहरुख खान याने चांगलंच गाजवलं आहे. चार वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर धमाकेदार पदार्पण करणाऱ्या शाहरुख खान याने एकाच वर्षात तीन चित्रपट रिलीज करून बॉक्स ऑफिसवर एकच कल्ला केला होता. त्याच्या ‘पठान’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तीनही चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाले होते. ओटीटीवर देखील चित्रपटांनी अनेक विक्रम रचत चांगला धुमाकूळ घातला. आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या ‘डंकी’ या चित्रपटाने शाहरुखच्या इतर चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
२०२३मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘डंकी’ या चित्रपटाने नेटफ्लिक्सवरील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाचे भारतातच नव्हे, तर जगभरात चांगले कलेक्शन झाले होते. या चित्रपटाने ४५० कोटींची कमाई केली आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटाने आता शाहरुखच्या ‘जवान’ या चित्रपटाला देखील मागे टाकले आहे. ‘जवान’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज झाल्यानंतर ११ दिवसांत ८.९ दशलक्ष लोकांनी पाहिला होता. तर, आता ‘डंकी’ या चित्रपटाने ‘जवान’चा रेकॉर्ड मोडत अवघ्या ४ दिवसांत ९.१ दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत.
शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाने रेकॉर्ड बनवण्याच्या बाबतीत प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटालाही मागे टाकले आहे. अवघ्या ४ दिवसांत, ‘डंकी’ने ‘सालार’चे टॉप व्हूज ऑन ओटीटी हे स्थान बळकावले आहे. ‘डंकी’ हा नेटफ्लिक्सवर तिसरा सर्वाधिक पाहिला गेलेला नॉन-इंग्रजी चित्रपट ठरला आही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘डंकी’ या चित्रपटाला नेटफ्लिक्सवर आतापर्यंत २४.१ मिलियन वॉच टाईम मिळाला आहे. म्हणजेच हा चित्रपट आतापर्यंत २.४१ कोटी तास पाहिला गेला आहे. याशिवाय ‘डंकी’ हा चित्रपट २१ देशांमध्ये ‘टॉप १०’ यादीत ट्रेंड करत आहे. भारत, युएई, श्रीलंका, बहरीन, बांगलादेश, ओमान, मालदीव आणि पाकिस्तानमध्ये हा चित्रपट पहिल्या स्थानावर आहे.
‘डंकी’ या चित्रपटाची कथा पंजाबमधील एका गावात घडत आहे. यात शाहरुख एका पंजाबी माणसाची भूमिका साकारत आहे, ज्याला कॅनडाला जायचे आहे. मात्र, देशाबाहेर जाण्यासाठी त्याच्याकडे सगळी कागदपत्रे नाहीत. अशा स्थितीत तो ‘डंकी फ्लाईट’चा वापर करतो. ‘डंकी फ्लाईट’ म्हणजे लपूनछपून दुसऱ्या देशात जाण्याचा मार्ग शोधायचा. तिथे पोहोचण्यासाठी वाटेत लागणाऱ्या सगळ्या छोट्या शहरांमधून प्रवास करायचा. पुढे त्याच्या आणि त्याच्या मित्रांच्या आयुष्यात काय काय घडते, हे या चित्रपटात पाहायला मिळते.
संबंधित बातम्या