Dua Lipa Music Concert : जगप्रसिद्ध लोकप्रिय गायिका दुआ लिपा हिने शनिवारी मुंबईत लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट सादर केला. या म्युझिक कॉन्सर्टची प्रचंड क्रेझ होती. त्यावर सर्वजण चर्चा करत आहेत. यावर अनेक स्टार्सनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुआची ही मैफिल अनेक कारणांमुळे चर्चेत होती. मात्र, यात सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे दुआ लिपाने ‘लेविटेटिंग x वो लडकी जो सबसे अलग है’ या गाण्याचे मॅशअप सादर केले.
दुआ लिपाने सादर केलेले हे गाणे ‘बादशाह’ चित्रपटातील आहे. या कॉन्सर्टनंतर सर्वत्र शाहरुख खानची चर्चा होत आहे. शाहरुख खानच्या गाण्यावर दुआ लिपाने परफॉर्म केल्याचे सर्वजण म्हणत आहेत. मात्र, हे गाणे गाणारा गायक यावर खूश नाही. हे गाणे गायक अभिजीत भट्टाचार्यने गायले आहे. याबाबत त्यांनी आणि त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. एका स्टोरीमध्ये कॉन्सर्टचा व्हिडिओ पोस्ट करताना अभिजीतच्या मुलाने लिहिले की, ‘हे गाणे अतिशय हिट आहे आणि लिजेंड अभिजीत आणि अनु मलिक यांच्यामुळे लोकप्रिय आहे.’
अभिजीतचा मुलगा जय भट्टाचार्यने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘दुर्दैवाने आपण अशा देशात राहतो जिथे कोणतेही न्यूज आउटलेट आणि इंस्टाग्राम गाण्याच्या आवाजाबद्दल आणि कलाकाराबद्दल बोलत नाही. मला खात्री आहे की, जेव्हा दुआ लिपाने हे गाणे ऐकले असेल, तेव्हा तिने ते कानाने ऐकले असेल, पण डोळ्यांनी पाहिले नसेल आणि तिने गाणे गाणाऱ्या व्यक्तीचे नक्कीच कौतुक केले असेल आणि तो व्यक्ती शाहरुख खान नाही. हे गाणे अभिजीत भट्टाचार्यचे असून, अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे.’
‘या गाण्याचं नाव आहे ‘वो लडकी जो सबसे अलग है - अभिजीत’. जेव्हा तुम्ही हे सर्च कराल, तेव्हा तुम्हाला फक्त हेच सापडेल. पण या देशातील मीडिया गायकाला त्याचे श्रेय घेऊ देत नाही. मग लोक मला विचारतात की, तू बॉलिवूडमध्ये गाणी का गात नाहीस? हे शाहरुख खानबद्दल नाही, मी त्याचा खूप मोठा चाहता आहे. पण हे प्रेक्षकांबद्दल आहे.'
जयची ही पोस्ट शेअर करताना अभिजीतने लिहिले की, ‘समस्या ही आहे की, ‘वो लडकी जो सबसे अलग है - अभिजीत’चे पुढे काय झाले याबद्दल कोणीच बोलत नाही’.
संबंधित बातम्या