आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री रवीना टंडन अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी तिच्या बेधडक विधानांमुळे प्रसिद्धी झोतात असते. मात्र, सध्या ती एका मारहाण प्रकरणामुळे मीडियामध्ये चर्चेत आली आहे. असा दावा केला जात आहे की, अभिनेत्री रवीना टंडन हिने एका वृद्ध महिलेसह आणखी दोन जणांना मारहाण केली आहे. या घटनेनंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
रवीनावर शनिवारी रात्री उशिरा मुंबईच्या वांद्रे उपनगरात तीन जणांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवीनाच्या ड्रायव्हरवर रिझवी कॉलेजजवळ कार्टर रोडवर निष्काळजीपणे गाडी चालवण्याचा आणि ३ जणांना धडक दिल्याचा आरोप आहे. याविषयी लोकांनी त्याला विचारले असता, अभिनेत्री मद्यधुंद अवस्थेत तिच्या कारमधून बाहेर आली. आणि तिने पीडितांना शिवीगाळ व मारहाण केली आहे.
वांद्रे येथे राहणाऱ्या मोहम्मद नावाच्या व्यक्तीने रवीनाविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीसांनी या प्रकरणात फारसे लक्ष दिले नसल्याचे म्हटले जात आहे. मोहम्मदच्या म्हणण्यानुसार, त्याची ७० वर्षीय आई, बहीण आणि भाची रिझवी कॉलेजजवळून जात असताना रवीनाच्या कार चालकाने त्याच्या आईला धडक दिली. यावेळी लोकांनी गाडी अडवून विचारणा केली असता चालकाने वाद घालण्यास सुरुवात केली आणि बाचाबाची सुरू झाली. यानंतर मद्यधुंद असलेली रवीनाही गाडीतून खाली उतरली आणि भांडायला लागली. यावेळी तिने या वृद्ध महिलेला धक्काबुक्की देखील केली.
रवीना टंडनचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पीडित महिला आणि स्थानिक लोक रवीनाला घेरून पोलिसांना फोन करत आहेत. तर, पिडीत व्यक्तीपैकी एक बोलत आहे की, ‘आजची रात्र तुला तुरुंगातच घालवावी लागणार आहे. माझ्या नाकातून रक्त येत आहे.’ यावेळी रवीना लोकांना व्हिडीओ रेकॉर्ड न करण्याची विनंती करते. जेव्हा लोक तिला घेरतात तेव्हा अभिनेत्री म्हणते की, ’कृपया मला धक्का मारू नका.’
मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटना घडल्यानंतर काही वेळाने रवीनाने त्या ठिकाणाहून पळ काढला. यानंतर पीडिता आणि त्याच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी खार पोलीस स्टेशन गाठले. काही वेळाने रवीनाचा पती अनिल थडानी पोलिस स्टेशनला पोहोचला. त्यांनी पीडिता आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हा दाखल केल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. अशा परिस्थितीत आता रवीना टंडन अडचणीत सापडली आहे.