Don 3 Lead Actress: बॉलिवूडच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या सिक्वेल किंवा पुढच्या भागांमध्ये आता नवीन चेहरे वर्णी लावताना दिसत आहेत. याच दरम्यान अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजवलेल्या ‘डॉन’ या चित्रपटाच्या सिक्वेलची धुरा एखाद्या तरुण अभिनेत्याकडे सोपवली जाऊ शकते, असा अंदाज बऱ्याच दिवसांपासून वर्तवला जात होता आणि तसंच काहीसं घडलं. फरहान अख्तरच्या ‘डॉन’च्या पुढच्या भागात अर्थात ‘डॉन ३’च्या रणवीर सिंहच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. आता शाहरुखऐवजी रणवीर सिंह ‘डॉन’ बनून सर्वांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
या बातमीने शाहरुखच्या चाहत्यांचे मन मात्र मोडले होते. पण, ‘डॉन ३’चा टीझर पाहिल्यानंतर रणवीर सिंह आपल्याला निराश करणार नाही, याची सगळ्यांनाच खात्री पटली आहे. मात्र, या चित्रपटाचा टीझरसमोर आल्यानंतर या चित्रपटात कोण मुख्य भूमिका साकारणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. तर, दुसरीकडे या चित्रपटात रणवीर सिंहसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून केली जात होती.
पण, आता या चित्रपटाबाबत नवीन माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, क्रिती सेननने कियारा अडवाणीच्या हातून हा चित्रपट हिसकावून घेतला आहे. या चित्रपटात आता कियारा अडवाणी ऐवजी क्रिती सेनन दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप क्रितीच्या नावावर कोणीही शिक्कामोर्तब केलेला नाही. नुकतीच एक्सेल एंटरटेनमेंटच्या ऑफिसबाहेर दिसल्याने आता क्रितीच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. क्रिती सेनन सध्या या चित्रपटासाठी निर्मात्यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
चाहत्यांना पुन्हा एकदा शाहरुख खान आणि प्रियांका चोप्रा ही जोडी ‘डॉन ३’मध्ये पाहायची होती. मात्र, आता नवीन स्टारकास्ट घेऊन निर्माते काय धमाका करणार आहेत, हे चित्रपटाच्या रिलीजनंतरच कळणार आहे. फरहानने त्याच्याकडून सर्व तयारी सुरू केली आहे. ‘डॉन ३’ हा चित्रपट सध्या प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे.
संबंधित बातम्या