Shreya Bugde first Tv Seial: झी मराठी वाहिनीवरील सर्वांचा आवडता आणि संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडेने अनेकांच्या मनात घर केले आहे. तिला प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवले. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आज २ फेब्रुवारी रोजी श्रेयाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी...
श्रेयाचा जन्म पुण्यातील एका मराठी कुटुंबात झाला आहे. अनेकांच्या नकला करण्याचा बालपणीचा छंद तिला 'चला हवा येऊ द्या'पर्यंत घेऊन येईल याची कल्पनाच तिला नव्हती. श्रेयाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलेही आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी ही आणले. २०१२मध्ये श्रेयाने ‘तू तिथे मी’ या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिच्या या पहिल्यावहिल्या मालिकेने तिला हवी तशी ओळख मिळवून दिली नाही. मात्र, 'फू बाई फू' या कार्यक्रमातून श्रेयाला खरी ओळख मिळाली. सुरुवातील तिला हे जमणार की नाही असा प्रश्न पडला होता. श्रेयाने एका गुजराती मालिकेत देखील काम केले आहे. आज ती अतिशय लोकप्रिय आहे.
वाचा: 'मुलांना शिस्त शिकवली नाही', जेहचे वागणे पाहून नेटकरी संतापले
श्रेया ही विवाहीत आहे. तिच्या पतीचे नाव निखिल सेठ असे आहे. २०१५मध्ये तिने प्रेमविवाह केला. त्या दोघांची ओळख एका मालिकेच्या सेटवर झाली होती. त्यांचे मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. ती अनेकदा सोशल मीडियावर पतीसोबतचे फोटो शेअर करताना दिसते.
श्रेयाने तिच्या विनोदबुद्धीने जरी प्रेक्षकांचे मन जिंकले असले तरी 'समुद्र' या नाटकात ती गंभीर भूमिकेत दिसली. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते. आजही श्रेयाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ आणि फोटो कायम सर्वांचे लक्ष वेधून घेतात.