बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे आयुषमान खुराना. त्याने अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका वेगळ्या विषयावर चित्रपट घेऊन येणारा अभिनेता म्हणून आयुषमान ओळखला जातो. तसेच तो एक उत्तम गायक देखील आहे. आज १४ सप्टेंबर रोजी आयुषमानचा वाढदिवस त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी...
आयुषमानचा जन्म १४ सप्टेंबर १९८४ रोजी चंदीगढमध्ये झाला. जन्मावेळी त्याचे नाव निशांत खुराना असे ठेवण्यात आले होते. मात्र त्यानंतर तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या नावात बदल करुन आयुषमान असे ठेवले. आयुषमानला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आयुषमान खुरानाने पंजाब यूनिवर्सिटीमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना त्याने नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने एमटीव्हीवरील रिअॅलिटी शो रोडीज २मध्ये सहभाग घेतला होता. या सिझनचा तो विजेता ठरला होता.
आयुषमानने वयाच्या १७व्या वर्षी 'पॉपस्टार' या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला. या शोमध्ये सहभागी होणारा आयुषमान सर्वात लहान होता. त्यानंतर त्याने 'विक्की डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या पहिल्यावहिल्या चित्रपटात त्याने अभिनयासोबतच गाणे देखील गायले. आयुषमानच्या आवाजाने सर्वांची मने जिंकली होती. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. तो अभिनय क्षेत्रातच पारंगत नाही तर गायन, वाद्ये आणि अँकरिंगमध्येही आयुष्मानचा हात कोणी धरू शकत नाही.
वाचा: म्हणून मी लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाणं बंद केलं; अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं!
आयुषमानचे 'नौटंकीसाला', 'बेवकूफियां' आणि 'हवाईजादा' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. 'दम लगाकर हईशा', 'बरेली की बर्फी', 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'आर्टिकल 15' आणि 'ड्रीम गर्ल' हे चित्रपट आले. या चित्रपटांनी बऱ्यापैकी कमाई केली.