पाकिस्तानी कलाकारांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये बराच काळ काम केले आहे. माहिरा खान आणि फवाद खान सारख्या पाकिस्तानी कलाकारांनी भारतीय चाहत्यांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयामुळे आणि लूकमुळे त्यांनी नेहमीच एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे अनेक पाकिस्तानी ड्रामा शो आहेत जे कथानकामुळे भारतीय प्रेक्षकांना खूप आवडतात. पण अशाच एका अभिनेत्रीला श्रीदेवीने स्वत:ची मुलगी मानले होते. आता ही अभिनेत्री कोण चला जाणून घेऊया...
'नादानियान' या मालिकेतून पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे सजल. 'इश्क-ए-ला', 'ये दिल मेरा', 'कुछ अनकही' आणि 'सुरे का सफर' यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या सजलची गणना पाकिस्तानातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. श्रीदेवी आणि सजलने २०१७मध्ये 'मॉम' या चित्रपटात एकत्र काम केले होते. सजलचा हा पहिला बॉलिवूड सिनेमा. या चित्रपटात ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि अदनान सिद्दीकीसोबत झळकली होती. बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची तिसरी मुलगी म्हणून सजल ओळखली जाते. श्रीदेवीसोबत या अभिनेत्रीचे अप्रतिम नाते होते आणि तिची ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. हा चित्रपट पाहून लोकांना खात्री पटली होती की दोघेही खऱ्या आयुष्यातही आई आणि मुलगी आहेत.
श्रीदेवी यांना दोन मुली आहेत. सध्या बॉलिवूडमध्ये सक्रीय असलेली जान्हवी कपूर आणि आर्चीज चित्रपटातून पदार्पण करणारी खुशी कपूर. पण फार कमी लोकांना माहित आहे की श्रीदेवी सजलला आपली तिसरी मुलगी म्हणायची. श्रीदेवी पहिल्यांदा सजलला कामाच्या निमित्ताने भेटली होती, पण त्यांची परस्पर केमिस्ट्री अशी झाली की तिने सजलची ओळख आपली तिसरी मुलगी म्हणून माध्यमांसमोर करून दिली. सजलने केवळ पडद्यावरच नव्हे तर पडद्याबाहेरही मुलीची भूमिका साकारली होती.
वाचा: त्याने मला बेडरुममध्ये बोलावले अन्...; सोनालीने संजय दत्तसोबतच्या त्या सीनवर केले वक्तव्य
एका चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान श्रीदेवी म्हणाली होती की, ‘सजल माझ्या तिसऱ्या मुलीसारखी आहे. आता मला वाटते की मला आणखी एक मुलगी आहे.’ वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सजल लवकरच प्रभाससोबत त्याच्या आगामी 'फौजी' चित्रपटात काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हनू राघवपुडी करत असून या चित्रपटात सजल दिसणार असल्याच्या वृत्तांना पाकिस्तानमध्ये दुजोरा देण्यात आला. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर 'फौजी' ही भारताच्या स्वातंत्र्यपूर्व पार्श्वभूमीवर युद्धादरम्यान लिहिलेली एक सुंदर प्रेमकथा आहे.