'पप्पी दे पारुला' या सुपरहिट अल्बमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर. विविध सिनेमां, रियालिटी शो,म्युजिक अल्बममधून वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मात्र स्मिता गोंदकरच्या आयुष्यातील एक धक्कादायक बाब फार कमी लोकांना माहित आहे. तिला फसवून एका नगरसेवकाने लग्न केले होते.
अभिनेत्री स्मिता गोंदकरची ओळख माजी नगरसेवक सिद्धार्थ बाठिया याच्यासोबत झाली होती. ओळखीनंतर त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे लग्नदेखील झाले. त्यांचे लग्नही अगदी थाटामाटात पार पडले होते. लग्नानंतर वर्सोवा येथे ती सिद्धार्थ सोबत राहत होती. लग्नानंतर स्मिता प्रचंड खुश होती. आपल्याला मनासारखा नवरा मिळाला म्हणून स्वतःला नशीबवान समजत होती. संसार सुरळीत चालू होता. मात्र लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर असा काही घडलं कि तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
एक दिवस स्मिताला एका महिलेचा फोन आला. तिने मी सिद्धार्थची पत्नी आहे आणि आम्हाला दोन मुलं देखील आहेत’ अशी धक्कादायक माहिती स्मिताला सांगितली. स्मिताला हे सर्व ऐकून धक्काच बसला होता. तिने याबाबत सिध्दार्थला विचारले असता त्याने अगोदरच पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला असल्याचे सांगितले. ''पहिल्या लग्नाबद्दल सांगितलं तर तू लग्नाला तयात होणार नाही या भितीने मी सर्व लपवून ठेवलं', असे कारण त्याने समोर केले. इतकच नाही तर डिवोर्स पेपरचे पुरावे देखील त्याने आणून दाखवले. स्मिताने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. एवढेच नाही तर स्मिताचा विश्वास बसावा म्हणून त्याने स्मितासोबतच्या लग्नाचे सर्टिफिकेटदेखील बनवून आणले.
पतीवर विश्वास असल्यामुळे स्मिताने या सर्व गोष्टींकडे कानाडोळा केला. पुन्हा आपले आयुष्य नॉर्मल करून संसाराचा गाडा पुन्हा सुरळीत चालवला. दरम्यान अनेकदा शूटला किंवा फंक्शनला स्मिता आणि सिद्धार्थ एकत्रित जात असल्यामुळे त्यांच्या लग्नाची माहिती सर्वांसमोर आली. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी देखील त्यांनी जंगी पार्टी दिली. या पार्टीला अनेक सेलिब्रिटी, नामांकित व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. ते पाहून एक दिवस एक महिला स्मिताच्या घरी आली आणि त्या महिलेने मी सिध्दार्थची पत्नी असल्याचे सांगितले.
महिलेचे सर्व बोलणे ऐकून घेतल्यावर स्मिताने घटस्फोट घेतलेल्या कागदपत्रांची चौकशी केली. तेव्हा घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाचे सर्व कागदपत्र खोटे असल्याचे तिच्या निदर्शनास आले. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच सिद्धार्थ विरुद्ध तिने तक्रार नोंदवली. त्यावेळी अनेक वृत्तपत्रांमधून ही बातमी छापण्यात आली होती. ही बाब जेव्हा समोर आली त्यावेळी सिध्दार्थने पोलिसांसमोर स्मिताला आपली पत्नी म्हणून मानण्यास नकार देत स्मितासोबत लग्नच केले नसल्याचा बनाव केला. सिद्धार्थ हे सांगताना जे कारण सांगितलं ते ऐकून सर्वाना धक्काच बसला. सिद्धार्थने ‘ते लग्नाचे फोटो खरे नसून एका शूटिंग दरम्यान काढलेले फोटो आहेत' असे म्हटले. हे सर्व ऐकून स्मिता आणखीनच खचून गेली.
वाचा: एका क्रिकेट मॅचमुळे गेला 'या' मराठमोळ्या अभिनेत्याचा जीव, वाचा नेमकं काय झालं
सिद्धार्थने केवळ तिलाच नव्हे तर तिच्यासारख्या अनेक तरुणींना फसवलं असल्याचं नंतर समोर आल्याचं सांगितलं जात. या सर्व प्रकरानंतर ती कोलमडून गेली होती. त्यानंतर ती काही काळ सिनेइंडस्ट्रीतून गायब होती. या सर्व घटनांमधून स्वतःला सावरत पुन्हा एकदा नव्याने ती सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली. तिचे एकापाठोपाठ एक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.