Divya Bharti Death : बॉलिवूड अभिनेत्री गुड्डी मारुती यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीसोबतच्या आठवणी शेअर केल्या. गुड्डी यांनी दिव्याला खूप चांगली मुलगी पण ती नेहमीच गोंधळलेली असायची असे म्हटले. यावेळी त्यांनी एक मोठा खुलासा केला. गुड्डी म्हणाल्या की, दिव्याला उंचीची कधीच भीती वाटत नव्हती. गुड्डी यांनी दिव्याला ५ व्या माळ्यावर खिडकीत बसलेले पाहिले होते. दिव्याच्या मृत्यूनंतर तिचा पती साजिद नाडियाडवाला पूर्णपणे खचला होता. दिव्याच्या मृत्यूच्या वेळी ती फक्त १९ वर्षांची होती.
सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत गुड्डी म्हणाल्या की, ‘दिव्या चांगली मुलगी होती, पण गोंधळलेली होती. मला तिच्या बालपणाबद्दल माहित नाही, पण ती थोडी अस्वस्थ होती. प्रत्येक दिवस जणू तिचा शेवटचा दिवसच होता, असं ती जगली. ही ती वेळ होती जेव्हा आम्ही शोला और शबनमचे शूटिंग करत होतो. ५ एप्रिलला तिचे निधन झाले आणि ४ एप्रिलला माझा वाढदिवस होता. मी, गोविंदा, दिव्या, साजिद आम्ही सगळे पार्टी करत होते. पार्टीत ती ठीक होती, पण मला ती थोडी निराश वाटली. तिला आऊटडोअर शूट लागलं होतं. पण तिला जायचं नव्हतं.’
दिव्याच्या मृत्यूबद्दल बोलताना गुड्डी म्हणाल्या की, जेव्हा त्यांना दिव्याच्या मृत्यूची माहिती मिळाली, तेव्हा त्या विमानात होत्या. आणखी एक घटना सांगताना गुड्डी म्हणाल्या, ‘दिव्या जुहूमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होती. एके रात्री मी आईस्क्रीम आणायला निघाले होते, आणि तिने मला आवाज दिला. मी पाहिलं की, दिव्या पाचव्या मजल्यावर पाय खिडकी बाहेर लटकवून बसली होती. मी तिला सांगितले की, ते तिच्यसाठी सुरक्षित नाही, त्यावर तिने उत्तर दिले की काहीही होत नाही. तिला उंचीची भीती वाटत नव्हती.’
गुड्डी यांनी आणखी एक किस्सा सांगताना म्हटले की, दिव्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्या तिच्या आईकडे गेल्या, तेव्हा तिथे एक मांजर होती, जिच्या तोंडाला रक्त लागले होते. हे पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या आईची प्रकृती अत्यंत वाईट झाली होती. साजिदचीही अवस्था अतिशय वाईट होती. ही घटना घडली तेव्हा तो घरी नव्हता. साजिदची गाडी आली आहे की, नाही हेच पाहण्यासाठी दिव्या खाली वाकली आणि तिचा तोल गेला. यावेळी नीता लुल्ला तिथे होत्या आणि त्यांनी दिव्याला पडताना पाहिले होते.