Happy Birthday Disha Vakani: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेमध्ये ‘दयाबेन’ची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री दिशा वाकाणी आज (१७ ऑगस्ट) तिचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. दिशा वाकाणीने गुजराती थिएटर आणि हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमधून अभिनयाला सुरुवात केली, पण दयाबेनच्या भूमिकेने तिला तिच्या करिअरमध्ये मोठा ब्रेक मिळाला. दयाबेनच्या व्यक्तिरेखेने दिशा वाकानीला घराघरात इतके प्रसिद्ध केले की, आजही तिची अनुपस्थिती लोकांना जाणवते.
दिशा वाकाणी ही मूळची गुजरातची आहे. तिचा जन्म १७ ऑगस्ट १९७८ रोजी अहमदाबाद येथे गुजराती जैन कुटुंबात झाला. दिशाने गुजराती थिएटरमधून रंगमंचावर अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने टीव्ही मालिकांमध्ये काम केले. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'पूर्वी दिशा वाकाणीने 'शुभ मंगल सावधान', 'खिचडी', 'झटपट खिचडी', 'हीरो भक्ती ही शक्ती है' आणि 'आहट' सारख्या टीव्ही शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय ती २०१४ साली 'सीआयडी'मध्येही दिसली होती.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये भूमिका साकारण्यापूर्वी दिशाने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला. सुरुवातीच्या काळात तिने बी-ग्रेड चित्रपटांमध्येही काम केले. दिशाने १९९७मध्ये आलेल्या 'कमसिन: द अनटच्ड' चित्रपटातही बोल्ड सीन दिले होते. अमित सूर्यवंशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दिशाने या चित्रपटात महाविद्यालयीन तरुणीची भूमिका साकारली होती. दिशाचाही हा डेब्यू चित्रपट होता. यानंतर दिशा अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसली. ‘देवदास’ आणि ‘जोधा अकबर’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही ती सहाय्यक भूमिकांमध्ये दिसली आहे. दिशा वाकाणीनेही मोठ्या पडद्यावर आपले नशीब आजमावले आहे. ती शाहरुख खानच्या 'देवदास' चित्रपटात दिसली होती. याशिवाय दिशा 'मंगल पांडे द रायझिंग', 'लव्ह स्टोरी २०५०' यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली आहे. पण, चित्रपटांमधून तिला फारशी ओळख मिळाली नाही. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' हा शो दिशाच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला.
दिशा २००८पासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये काम करत होती. तिने सप्टेंबर २०१७मध्ये प्रसूती रजा घेतली होती. पण, तिला शो सोडून ७ वर्षे झाली आहेत. या काळात दिशा प्रत्येक एपिसोडसाठी १.५ लाख रुपये घेत होती. या शोने दिशाचे नशीब बदलले. लोक तिला दिशाऐवजी ‘दयाबेन’ म्हणून ओळखतात. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका दिशा वाकाणीच्या अभिनय कारकिर्दीतील एक मैलाचा दगड ठरली. दिशाने २०१५मध्ये मुंबईतील चार्टर्ड अकाउंटंट मयूर पंड्यासोबत लग्न केले. दिशा लग्नानंतर लाईमलाईटपासून दूर आहे.