Shyam Benegal Death: 'समांतर' सिनेमाचे जनक, प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे २३ डिसेंबर रोजी निधन झाले आहे. श्याम बेनेगल हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना किडनीशी संबंधीत आजार झाला होता. आज, वयाच्या ९०व्या वर्षी श्याम बेनेगल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये शोक व्यक्त केला जात आहे. श्याम बेनेगल यांच्या निधनाच्या वृत्ताला मुलीने दुजोरा दिला आहे.
वडिलांच्या निधनानंतर पिया बेनेगल यांनी पीटीआयशी संवाद साधला. 'श्याम बेनेगल यांचे मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सायंकाळी ६ वाजून ३८ मिनिटांनी निधन झाले. अनेक वर्षांपासून त्यांना किडनीशी संबंधीत आजार होता. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि या आजारामुळेच त्यांचे निधन झाले आहे' असे पिया बेनेगल यांनी म्हटले आहे.
श्याम बेनेगल यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पेडर रोडवरील त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ नंतर त्यांची अंत्ययात्र निघणार असून, दुपारी २ वाजता दादर येथील शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात येणार आहे.
'वेलकम टू सज्जनपूर' सिनेमाचे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी १४ डिसेंबर रोजी ९०वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या थाटामाटात वाढदिवस साजरा केला. जवळचा मित्र परिवार, कुटुंबीयांनी मिळून श्याम बेनेगल यांचा वाढदिवस साजरा केला होता. त्यामध्ये अभिनेता नसिरुद्दीन शाह, दिव्या दत्ता, शबाना आझमी, कुलभूषण खरबंदा, राजत कपूर, अतुल तिवारी, शशी कपूर, कुणाल कपूर आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली होती.
श्याम बेनेगल यांना १९७६ रोजी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर १९९१ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. श्याम बेनेगल यांनी 'अंकुर' या सिनेमाचे दिग्दर्शन करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अनंत नाग आणि शबाना आझमी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते. त्यानंतर १९७५ रोजी त्यांनी निशांत सिनेमाचे दिग्दर्शन केले. हा चित्रपट १९७६ रोजी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आला होता. गिरीश कर्नाड, शबाना आझमी, अनंत नाग, अमरीश पुरी, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते.
वाचा: वहिदा रहमान यांनी डेब्यू केलेला सिनेमा आठवतोय का? ठरला होता १९५६मध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा
श्याम बेनेगल यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यामध्ये 'मंथन', 'झुबैदा', 'सरदारी बेगम', 'वेलकम टू सज्जनपूर', 'भूमिका' अशा अनेक सुपरहिट चित्रपटांची नावे आहेत.