Dilip Kumar Birth Anniversary : बॉलिवूडचे ट्रॅजेडी किंग, ज्यांना डायलॉग बोलताना पाहून प्रेक्षक सगळं काही विसरून जात होते, ते म्हणजे अभिनेते दिलीप कुमार. आज (११ डिसेंबर) दिलीप कुमार यांची जयंती आहे. चित्रपटसृष्टीत त्यांच्यासारखा कलाकार कधीच नव्हता आणि होणार नाही. त्यांनी आपली प्रत्येक भूमिका इतक्या सुंदरपणे प्रेक्षकांसमोर मांडली की, ते सर्व वयोगटातील लोकांचे लाडके बनले. मात्र, जग त्यांना ज्या नावाने ओळखतं, ते त्यांचं खरं नाव नाही. तुम्हाला त्यांच्या नावाचा किस्सा माहीत आहे का? चला जाणून घेऊया...
दिलीप कुमार यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत इतके काम केले आहे की, त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से आजही ऐकायला मिळतात. दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. कदाचित हे अनेकांना माहीतही नसेल. पण, चित्रपटात येण्यापूर्वी त्यांचे नाव बदलले आणि ते पुढे दिलीप कुमार या नावानेच जगभर प्रसिद्ध झाले.
दिलीप कुमार यांचे वडील फळे विकण्याचा व्यवसाय करायचे. एकदा त्यांचा वडिलांशी काही कारणावरून वाद झाला आणि ते मुंबईहून पुण्याला पळून गेले. त्यांनी पुण्यातील आर्मी कॅन्टीनमध्ये सँडविच विकण्याचे काम केले, पण काही काळानंतर ते मुंबईला आपल्या कुटुंबासह राहायला आले. यादरम्यान एका मैत्रिणीच्या माध्यमातून त्यांची भेट बॉम्बे टॉकीजची मालकीण देविका राणी यांच्याशी भेट झाली. देविकाने दिलीप साहेबांना पाहिले आणि त्यांना नोकरी देऊ केली.
दिलीप कुमार यांनी त्यांच्या 'दिलीप कुमार: द सबस्टन्स अँड शॅडो' या चरित्रात सांगितले आहे की, एके दिवशी देविका राणीने दिलीप साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाल्या की, तुम्हाला चित्रपटात काम करायचे आहे का? यावर दिलीप कुमार यांनी लगेच होकार दिल होता. मात्र, त्यांच्या वडिलांना हे मुळीच पटलं नाही.
दुसरीकडे देविका राणी यांनी आपल्या चित्रपटात युसूफ खानला लॉन्च करणार असल्याचे मनाशी ठरवले होते. मात्र, या आधी युसूफला एक नाव द्यावे जे प्रेक्षकांशी जोडले जाईल, अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी दिलीप कुमार या नावाचा विचार केला. त्याचवेळी युसूफ खान यांना भीती वाटत होती की, जर आपल्या वडिलांना अभिनयाची माहिती मिळाली तर आपल्याला बेदम मार खावा लागेल. अशा परिस्थितीत, स्क्रीनवरील नाव बदलणे चांगले होईल. त्यानंतर १९४४ मध्ये 'ज्वार भाटा' या चित्रपटातून त्यांना दिलीप कुमार या नावाने लॉन्च करण्यात आले.
दिलीप कुमार एका मुलाखतीत म्हणाले होते की, ‘माझ्या वडिलांकडून मार मिळण्याच्या भीतीने मी चित्रपटांमध्ये नाव बदलले होते. त्यांच्या जवळच्या मित्राचा मुलगा पृथ्वीराज कपूर चित्रपटांमध्ये काम करत होता आणि या कामाबद्दल त्यांचे वडील अनेकदा त्यांच्या मित्राकडे तक्रार करायचे की त्यांचा तरुण मुलगा हे कसलं काम करतो. अशा स्थितीत आपला मुलगाही असेच काम करत असल्याचे त्यांना समजले असते, तर त्यांना नक्कीच खूप राग आला असता.’
संबंधित बातम्या