Dileep Shankar Death : मल्याळम मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेते दिलीप शंकर यांचे निधन झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. २९ डिसेंबरला सकाळी तिरुवनंतपुरममधील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. मात्र, ही हत्या आहे की, आत्महत्या की नैसर्गिक मृत्यू याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे अहवालात म्हटले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेते त्यांच्या 'पंचाग्नी' या मालिकेच्या शूटिंगसाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या खोलीतून दुर्गंध येऊ लागल्याने, त्यांनी या रूमचा दरवाज उघडून पाहिला. यावेळी अभिनेत्याच्या मृत्यूची माहिती समोर आली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेते दिलीप शंकर त्यांच्या हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडताना दिसले नसल्याचेही बोलले जात आहे. त्यांचा मृत्यू किमान दोन दिवसांपूर्वी झाला असावा असा अंदाज बांधला जात आहे. हॉटेलच्या खोलीतील एसी सुरू होता आणि यामुळे त्यांचे शरीर फार कुजलेले नव्हते. या संबंधित माहिती देताना पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, अभिनेत्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या होत्या, परंतु मृत्यूचे खरे कारण अद्याप समजलेले नाही. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण समजेल.
दिलीप यांच्या निधनामुळे मल्याळम इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या अशा आकस्मिक मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर चाहत्यांकडून सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'पंचाग्नी' टीव्ही शोच्या दिग्दर्शकाने खुलासा केला आहे की, गेल्या काही दिवसांपासून अभिनेते दिलीप गंभीर आजाराचा सामना करत होते. आतापर्यंत या आजाराचे नाव आणि त्याच्याशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. दिलीप शंकर यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तथापि, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अधिकाऱ्यांना समजलेले नाही. त्यांच्या मृत्यूमागे कोणाचा हात असेल, असेही काही प्राथमिक तपासात आढळून आलेले नाही.
दिलीप शंकर हे त्यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिका 'अम्मरियाते' आणि 'पंचाग्नी'साठी ओळखले जातात. याशिवाय ते इतर अनेक मल्याळम शोंचा भाग होते. नुकत्याच सुरू झालेल्या 'अम्मारियाते' या शोमध्ये त्यांची 'पीटर' ही भूमिका लोकांना खूप आवडली होती. याशिवाय, ते अनेक चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी देखील ओळखला जातात. दिलीप यांच्या लोकप्रिय चित्रपटांबद्दल बोलायचे तर त्यात, 'चप्पा कुरीशु' आणि 'नॉर्थ २४' यांचा समावेश आहे. या अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
संबंधित बातम्या