Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Jethalal : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेल्या बऱ्याच काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या दरम्यान, त्यातील अनेक महत्त्वाच्या पात्रांनी ही मालिका सोडली आहे. गेल्या काही काळापासून या मालिकेच्या सेटवरून अनेकदा भांडणाचे आणि वादांचे किस्से देखील समोर येत आहेत. दरम्यान आता अभिनेते दिलीप जोशी आणि निर्माते असित मोदी यांच्यात देखील वाद झाल्याचे समोर येत आहे.
अभिनेते दिलीप जोशी हे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रमुख कलाकार आहेत. दिलीप या मालिकेत ‘जेठालाल’ची भूमिका साकारत आहेत. आता या शोशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी यांचा असित मोदी यांच्यासोबत जोरदार वाद झाला आहे. हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते आणि दिलीप जोशी यांनी यावेळी शो सोडण्याची धमकी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी आणि असित मोदी यांच्यात ऑगस्ट महिन्यात भांडण झाले होते. कलाकारांच्या सुट्ट्यांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता, असे सांगितले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी आपल्या सुट्ट्यांबद्दल निर्मात्यांनी आपल्याशी बोलण्याची वाट पाहत होते, पण असित याबद्दल बोलायला तयार नव्हते. या प्रकरणी दिलीप जोशी प्रचंड संतापले होते.
प्रॉडक्शनशी संबंधित सूत्रांनी एका वेब पोर्टलला माहिती देताना सांगितले की, ‘कुश शाहच्या म्हणजेच गोलीच्या शूटिंगचा तो शेवटचा दिवस होता. दिलीपजी सुट्टीसाठी असित परत येऊन त्यांच्याशी बोलण्याची वाट पाहत होते. पण असितभाई आले आणि सरळ कुशला भेटायला गेले. ही गोष्ट दिलीपजींना रुचली नाही. दिलीपजींना खूप राग आला आणि दोघांमध्ये वाद सुरू झाला. या भांडणात दिलीपजींनी असित मोदींची कॉलर पकडली आणि शो सोडण्याची धमकी दिली. मात्र, असित भाई यांनी त्यांना शांत केले.’
दोघांचे भांडण कसे मिटले हे अद्याप कळू शकलेले नाही. तसेच हे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने दिल्याचे म्हटले जात आहे. दिलीप जोशी किंवा असित मोदी यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. दोघांमध्ये नेमकं काय झालं, हे अजूनही समोर आलेलं नाही.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. दररोज संध्याकाळी ८.३० वाजता ही मालिका सब टीव्हीवर प्रसारित केली जाते.