मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Dharmaveer: विजू मानेंनी धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेला दिला होता नकार, प्रवीण तरडेंनी सांगितला अनुभव

Dharmaveer: विजू मानेंनी धर्मवीर आनंद दिघे या भूमिकेला दिला होता नकार, प्रवीण तरडेंनी सांगितला अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 22, 2022 05:19 PM IST

Prasad Oak: विजू माने हे ठाणेकर आहेत. तरीदेखील त्यांनी या भूमिकेला नकार का दिला? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

धर्मवीर
धर्मवीर (HT)

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. अभिनेता, निर्माता मंगेश देसाई याच्या मनात घोळत असलेला एक विषय प्रत्यक्षात पडद्यावर येईपर्यंतचा धर्मवीरचा प्रवासही खूप रंजक आहे. हा सिनेमा पाहून, वा, मस्त झालाय सिनेमा, सगळे कॅरेक्टर एकदम छान आहेत, प्रसंग खूप छान गुंफलेत अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या. पण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा काहीसा वेगळा अनुभव होता. त्यांनी धर्मवीर आनंद दीघे या भूमिकेच्या कास्टिंगचा अनुभव सांगितला आहे.

चित्रपटाविषयी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, 'माझ्या आजवरच्या सगळ्या सिनेमांपैकी मला सर्वात जास्त घाम फोडणारा धर्मवीर हा सिनेमा आहे.' आता प्रवीण तरडे यांच्यासारख्या कसलेल्या अभिनेता आणि दिग्दर्शकाला या सिनेमाने का बरं घाम फोडला असावा हे जाणून घेण्याची उत्सुकता वाढली ना? तर त्याची कारणंही प्रवीण यांनी सांगितली आहेत. झी टॉकीज वर होणाऱ्या वर्ल्ड प्रीमियरच्या निमित्ताने या सिनेमाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी पुन्हा एकदा या सिनेमामेकिंगचा पट गप्पांमधून उलगडला आणि अनेक गोष्टींना उजाळा दिला.

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा म्हणजे धर्मवीर नेते आनंद दिघे यांचा जीवनपट आहे. त्यामुळे सिनेमातील आनंद दिघे यांच्या मुख्य व्यक्तीरेखेपासून त्यांच्या राजकीय प्रवासातील सहकाऱ्यांच्या व्यक्तीरेखांसाठी कास्टिंग निवड करणे हे फार मोठं आव्हान होतं. याच विषयावर प्रवीण तरडे यांना बोलतं केलं. प्रवीण सांगतात, 'सिनेमाचा निर्माता आणि माझा मित्र मंगेश देसाई याची फार इच्छा होती की त्याला आनंद दिघेंची भूमिका करायला मिळावी. हट्ट नाही पण लुक टेस्ट घेण्याचा मंगेशने आग्रह धरला. पण तो काही आनंद दिघे लुकमध्ये फिट बसला नाही. भाडिपाच्या सारंग साठे याचं नाव पुढे आलं. त्याच्या फोटोवर काम केलं. सारंग दिघे साहेबांच्या जवळपास जात होता, पण त्याच्या काही नियोजित कामासाठी तो परदेशात असल्याने त्याचं नाव मागे पडलं.'

पुढे ते म्हणाले, 'दरम्यान दिग्दर्शक विजू माने यांनी दिघे करावेत यासाठी त्यांची लुकटेस्ट घ्यायचं ठरलं. पण झालं असं की, विजू माने हे ठाणेकर आहेत. ते म्हणाले, मी जर आनंद दिघे पात्र केलं तर माझं ठाण्यातील वावरणं कठीण होईल. माझं स्वातंत्र्य कुठेतरी बंदिस्त होईल. विजू माने यांच्या नकारानंतर मात्र कास्टिंगचं टेन्शन यायला लागलं. तेव्हाच माझ्या एका मित्राने प्रसाद ओकच्या फोटोवर काही ग्राफिक करून आनंद दिघे लुक केला आणि ते फोटो मला पाठवले. प्रसाद दिघेसाहेबांच्या जवळपासच नव्हे तर हुबेहुब दिसत होता. त्याक्षणी मला माझे दिघे साहेब मिळाले. प्रसादची ऑडिशन घेण्याचा प्रश्नच नव्हता हे त्याने सिनेमातील भूमिकेतून सिध्द करून दाखवले.'

IPL_Entry_Point

विभाग