Dhanush Vs Nayanthara Clashes : दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि अभिनेता धनुष यांच्यात नेटफ्लिक्सच्या 'नयनतारा : बियॉन्ड द फेअरीटेल' या डॉक्युमेंटरीवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वी नयनताराने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे धनुषवर निशाणा साधला होता. धनुषने नयनतारा आणि तिच्या पतीला कायदेशीर नोटीस पाठवली होती. नयनतारा आणि तिचा पती विघ्नेश शिवन यांनी माहितीपटात ‘नानुम राउडी धन’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानच्या काही दृश्यांचा वापर त्याच्या परवानगीशिवाय केल्याचा आरोप धनुषने केला आहे. आता नयनतारा आणि विघ्नेशच्या वकिलांनी कायदेशीर नोटीसवर प्रतिक्रिया दिली आहे.
नयनतारा आणि विघ्नेशचे वकील राहुल धवन यांनी हिंदुस्थान टाईम्सशी खास बातचीत करताना सांगितले की, त्यांनी धनुषला कायदेशीर नोटीस पाठवून त्याच्या नोटीसला उत्तर दिले आहे. डॉक्युमेंटरीमध्ये वापरण्यात आलेले पडद्यामागचे भाग चित्रपटातील नसल्याने कोणतेही हक्क उल्लंघन झाले नसल्याचे आम्ही आमच्या नोटीसमध्ये म्हटले आहे. ती क्लिप त्यांच्या पर्सनल लायब्ररीतील आहे. त्यामुळे कोणतेही उल्लंघन होत नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी मद्रास उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे.
नयनताराने धनुषविरोधात एक लांबलचक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली तेव्हा हा वाद चर्चेत आला होता. नयनताराने या पोस्टमध्ये आरोप केला होता की, धनुषने तिला १० कोटींची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. डॉक्युमेंटरीमध्ये ‘नानुम राउडी धन’च्या बिहाइंड द सीन्सची तीन सेकंदाची क्लिप वापरल्याबद्दल धनुषने ही नोटीस पाठवली होती. नयनताराने या पोस्टमध्ये स्पष्ट केले होते की, चित्रपटात वापरलेली क्लिप तिच्या वैयक्तिक फोनवरून बनवण्यात आली होती. त्यामुळे यावर कुणाचाही अधिकार नाही, असे तिने म्हटले होते.
धनुषच्या म्हणण्यानुसार, नयनतारा, विघ्नेश आणि त्यांची कंपनी राउडी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी त्यांच्या अनुमतीशिवाय चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केला, जे त्यांच्या व्यावसायिक हक्कांचे उल्लंघन आहे.२७ नोव्हेंबर रोजी मद्रास उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली होती. न्यायमूर्ती अब्दुल क्विदौस यांनी या प्रकरणाच्या बाबतीत नयनतारा, विघ्नेश शिवन आणि इतर संबंधित पक्षांकडून उत्तर मागितले होते. न्यायालयाने त्यांना धनुषच्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते. सुनावणी दरम्यान धनुषच्या वतीने वकिलांनी आपल्या बाजूने विविध मुद्दे मांडले होते.
‘नयनतारा : बियॉन्ड द फेअरीटेल’ डॉक्युमेंट्रीबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. नयनताराचे वैयक्तिक आयुष्य आणि तिच्या कारकिर्दीतील संघर्षावर हा डॉक्युमेंटरी आधारित आहे. नयनताराच्या लग्नाचे चित्रणही दाखवण्यात आले आहे.