Dhanush and Aishwaryaa Divorce : साऊथ स्टार धनुष आणि रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत यांनी आपले १८ वर्षांचे नाते आता संपवले आहे. या दोघांचे लग्न २००४मध्ये झाले होते. या जोडप्याला लिंगा आणि यात्रा ही दोन मुले आहेत. लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोघेही एकत्र मिळून आपल्या मुलांचे संगोपन करणार आहेत. २७ नोव्हेंबर रोजी ऐश्वर्या चेन्नई कुटुंब कल्याण न्यायालयात एका सत्रात हजर झाली होती. याच सत्रात घटस्फोटाच्या अंतिम आदेशाची घोषणा सुनावण्यात आली.
२०२२मध्ये सोशल मीडियावर आपण विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर या जोडप्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, गेली दोन वर्ष यावर काहीच अपडेट समोर आली नाही. काही काळापूर्वी सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, दोघे पुन्हा एकत्र एक नवी सुरुवात करू शकतात. हे दोघेही तीनवेळा सुनावणीला हजर न राहिल्याने असा अंदाज बांधण्यात आला होता. मात्र, २१ नोव्हेंबर रोजी दोघांनीही कोर्टात आपला अर्ज सादर करत, घटस्फोट घेत, वेगवेगळ्या वाटेवर पुढे जायचे असल्याचे सांगितले. घटस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी २७ नोव्हेंबर रोजी ठेवली होती. यावरून आज सुनावणी झाली आणि दोघांच्या घटस्फोटाला अखेर मंजूरी देण्यात आली.
ऐश्वर्या आणि धनुषने २००४ मध्ये चेन्नईमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. १७ जानेवारी, २०२२ रोजी, धनुष आणि ऐश्वर्याने त्यांच्या विभक्त होण्याचा निर्णय शेअर करत एक संयुक्त निवेदन जारी केले. धनुष आणि ऐश्वर्या हे यात्रा आणि लिंग या दोन मुलांचे पालक आहेत आणि ते आपल्या मुलांचे एकत्र संगोपन करत आहेत.
सध्या नयनतारा आणि धनुषचा वाद विकोपाला गेला आहे. नयनताराच्या आरोपानंतर धनुष अलीकडेच चर्चेत आला होता. नयनताराने शनिवारी (१६ नोव्हेंबर) इंस्टाग्रामवर तीन पानांचे पत्र प्रसिद्ध केले होते, ज्यामध्ये तिने धनुषवर तिच्या ‘नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल’ या माहितीपटात तिच्या ‘नानुम राउडी धान’ या चित्रपटातील मजकूर जाणूनबुजून रोखल्याचा आरोप केला होता. अभिनेत्रीने या पत्रात म्हटले होते की, या क्लिपसाठी धनुषने तिला १० कोटी रुपयांची नोटीस पाठवली होती. यामध्ये तिने असेही म्हटले होती की, हा व्हिडिओ चित्रपटाच्या सेटवर तिच्या वैयक्तिक उपकरणांसह शूट करण्यात आला होता, जो आता या माहितीपटाचा एक भाग आहे.