Lalbaugcha Raja: सध्या संपूर्ण देशभरात बाप्पाच्या आगमनामुळे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. बाप्पाची आराधना, त्याची सेवा यामध्ये प्रत्येकजण मग्न झालाय. त्यातच सार्वजनिक गणोशोत्सव मंडळात आकर्षक देखावे, सुबक मुर्ती पाहण्यासाठीही बरीच गर्दी जमा झालीये. मुंबईतील लालबागच्या राजाची एक वेगळीच चर्चा पाहायला मिळते. सगळीकडे लालबागच्या राजाच्या मंडपातील सर्वसामान्य भाविकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्जीने लालबागच्या राजाच्या संबंधीत केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
देवोलीना भट्टाचार्जीने एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले आहे की गेली अनेक वर्ष लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ती जात होती. पण गेल्या वर्षी तिच्यासोबत असे काही घडले की तिने लालबागच्या राजाचे दर्शन घेणे सोडून दिले. तिथला गणपती फक्त सेलिब्रिटींचा गणपती बनला आहे असे स्पष्ट मत देवोलीनाने मांडले आहे.
'मी जवळपास १० ते ११ वर्षांपासून लालबागला जात आहे. मागच्या वर्षी असे काही घडले की माझी तेथे जाण्याची इच्छा मेली. तिथे जाऊन लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्याचे भाग्य मला अनेकदा लाभले आहे. हे मला चांगलेच ठाऊक आहे. त्यासाठी मी स्वत:ला भाग्यवान देखील समजते. पण मग इतर भक्तांना जी वागणूक दिली जाते, ते पाहून मला खूप त्रास होतो' असे देवोलीना म्हणाली.
पुढे ती म्हणाली, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, वृद्ध महिला/पुरुष, गरोदर स्त्रिया, लहान मुलांसह लोक बाप्पाच्या दर्शनासाठी येतात. त्यांना जी वागणूक दिली जाते ती अतिशय वाईट आहे. ती पाहून मी वैतागले. बाप्पा सर्वांचा आहे, सर्वांना समान मान-सन्मान मिळायला हवा. या लोकांमुळे हा गणपती सेलिब्रिटींचा बाप्पा बनला आहे. लालबागच्या राजाशी माझे खूप वेगळे नाते आहे. तेथे गेल्यावर मला जे जाणवते कायम तसेच राहिल पण..." या पोस्टमध्ये देवोलीनाने हृदय तुटल्याचा देखील इमोजी वापरला आहे.
वाचा: 'बिग बॉस मराठी'साठी अभिजीत-निक्कीने घेतले लाखो रुपये, सूरज चव्हाणला आठवड्याला किती मिळते फी?
अलीकडेच कुमकुम भाग्य मालिकेत काम करणाऱ्या सिमरन बुधरुपसोबत देखील लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यावर वाईट अनुभव आला आहे. तिने मंडपातील बाऊन्सर्सवर गैकवर्तनाचा आरोप केला आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सिमरनने शेअर केला आहे. तसेच सिमरनच्या हातातील फोन देखील मंडपातील बाऊंसर खेचत असल्याचे सांगितले होते. आता देवोलीनाने केलेल्या या पोस्टने तर सर्वांचे लक्ष वेधले आहे.