झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय आणि सर्वांची आवडती मालिका म्हणजे 'देवमाणूस.' या मालिकेच्या दोन्ही सिझनने प्रेक्षकांना वेड लावले होते. या मालिकेतील डिंपल आणि अजित या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता अजितची भूमिका साकारणारा किरण गायकवाड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो एका नव्याकोऱ्या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' या मालिकेत टायटल रोल साकारत डॉक्टरच्या रूपात महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचलेला किरण गायकवाड मागील बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर रमला आहे. डीजे ते मुख्य अभिनेत्याचा किरणचा अभिनयातील प्रवास नवोदितांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. याच किरणला सध्या कोणाचा तरी 'नाद' लागला आहे. हा 'नाद' कोणाचा आहे हे लवकरच समजेल, पण 'नाद - द हार्ड लव्ह' असं शीर्षक असलेल्या किरणच्या आगामी मराठी चित्रपटाचा नुकताच मुहूर्त झाला असून, चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
वाचा: आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'प्रभू श्रीराम' गाणे ऐकलत का?
'नाद - द हार्ड लव्ह' या शीर्षकावरूनच ही एक लव्ह स्टोरी असल्याचं समजतं. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी आपापल्या परीने प्रेमकथा सादर करत रसिकांचं मनोरंजन केलं असलं तरी प्रत्येक चित्रपटात प्रेमाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो. 'नाद' या चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याचं गुपित सध्या गुलदस्त्यात आहे. किरण गायकवाड हा प्रचंड ताकदीचा अभिनेता मुख्य भूमिकेत दिसणं हि या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. नायकाच्याच नव्हे, तर खलनायकी भूमिकाही अगदी सहजपणे साकारण्याची हातोटी किरणकडे आहे. या चित्रपटातील नायक किरण कशा प्रकारे साकारतो हे पहाणं प्रेक्षकांसाठी आणि विशेषत: त्याच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.