Devara OTT Release: साऊथ सुपरस्टार अभिनेता ज्युनिअर एनटीआर आणि बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारर ‘देवरा: भाग १’ हा चित्रपट २७ सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. दिग्दर्शक कोरटाला सिवा दिग्दर्शित ॲक्शन-थ्रिलरला लोकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. या चित्रपटातून जान्हवी कपूरने तेलुगूमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घर बसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे.
ज्युनियर एनटीआरचा ‘देवरा: भाग १’ हा चित्रपट एका महिन्याहून अधिक कालावधीनंतर ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. याची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली आहे. मंगळवारी, नेटफ्लिक्स इंडियाने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि खुलासा केला की, हा चित्रपट ८ नोव्हेंबर रोजी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
नेटफ्लिक्सने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये ज्युनिअर एनटीआर हातात भाल्यासारखे काहीतरी घेऊन दगडावर उभा असलेला दिसत आहे. हा फोटो शेअर करताना, नेटफ्लिक्स प्लॅटफॉर्मने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘ही वेळ आहे… हीच वेळ आहे भीतीतून बाहेर पडण्याची, समुद्र लाल करण्याची आणि टेकड्यांवरून वाघाची डरकाळी फोडण्याची वेळ आली आहे. ८ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर देवरा पहा.’ विशेष म्हणजे, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रथम प्रदर्शित होईल. ‘देवरा: भाग १’च्या हिंदी व्हर्जनच्या रिलीजची घोषणा अद्याप झालेली नाही.
‘देवरा : पार्ट १’ ओटीटीवर रिलीज होतेय ही बातमी ऐकून चाहतेही खूप खूश झाले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी लगेच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘वाह, आम्ही खूप वाट बघत होतो.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘देवरा नावाचे वादळ येत आहे.’ अनेकांनी रेड हार्ट आणि फायर इमोजी बनवून आपली उत्सुकता दाखवली. आता या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन कधी रिलीज होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर या मुख्य कलाकारांव्यतिरिक्त सैफ अली खानने ‘देवरा’मध्ये खलनायक भैराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाइन टॉम चाको, प्रकाश राज, श्रीकांत आणि अजय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.