कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रतिष्ठेची ग्रांप्री अर्थात ग्रँड प्रिक्स जिंकून पायल कपाडिया हिने विक्रम रचला आहे. २०१५ ते २०१८ दरम्यान एफटीआयआयमध्ये चित्रपट दिग्दर्शन विभागाची माजी विद्यार्थिनी पायल कपाडिया ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली आहे. मात्र, तिने हा इतिहास रचला, तरी पायल कपाडियाच्या अडचणी अजूनही कायम आहेत. याला कारणीभूत ठरली आहे, तिच्यावर असलेली एक जुनी केस. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला विरोध करण्यासाठी २०१५ मध्ये झालेल्या आंदोलनासाठी पायाल कपाडिया आणि इतर ३४ जणांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे पायल कपाडियाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पायल कपाडिया ही शनिवारी 'ऑल वी इमॅजिन एज लाईट' या चित्रपटासाठी ग्रांप्री पुरस्कार पटकावणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरली. मात्र, तिच्या या आनंदाचा मार्ग तितकासा सुरळीत राहिलेला नाही.
कान्सवरून परतल्यावर पायल कपाडिया २६ जून रोजी पुणे न्यायालयात दाखल झाली आहे. मात्र, पुण्यातील सत्र न्यायालयाने सर्व ३५ विद्यार्थ्यांना न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सूट दिल्याने एफटीआयआयचे माजी विद्यार्थी सुनावणीला उपस्थित राहण्याची शक्यता नाही. एफटीआयआयच्या इतिहासात १३९ दिवस वर्ग आणि इतर सर्व शैक्षणिक उपक्रमांवर बहिष्कार टाकून सर्वात प्रदीर्घ आंदोलन करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांपैकी ती एक होती. १७ ऑगस्ट २०१५ रोजी एफटीआयआयच्या लॉ कॉलेज रोड परिसरात आंदोलकांनी संस्थेचे तत्कालीन संचालक प्रशांत पथराबे यांना घेराव घालून त्यांच्या कार्यालयात डांबून ठेवले होते. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी पायलसह ३५ विद्यार्थिनींवर गुन्हा दाखल करून १४ मार्च २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले. आरोपपत्रात तिची आरोपी क्रमांक २५ म्हणून नोंद करण्यात आली होती.
संचालकांना चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांवर दंगलीचे ही आरोप ठेवण्यात आले होते. ३५ पैकी पाच विद्यार्थ्यांना अटकही करण्यात आली. चौहान यांचा कार्यकाळ पूर्ण होत असताना सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्याने अखेर विद्यार्थी शिक्षणाकडे वळले. तब्बल नऊ वर्षांपासून हे प्रकरण पुण्यातील सत्र न्यायालयात सुरू असून, या खटल्यातून सुटका व्हावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांची नावे घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने आम्हाला दोषमुक्तीचा अर्ज दाखल करायचा आहे. या घटनेचे व्हिडिओ फुटेज असलेल्या डिजिटल व्हिडीओ डिस्कवर (डीव्हीडी) सरकारी पक्ष अवलंबून असल्याने आम्ही त्यांना त्या डीव्हीडीची प्रत शेअर करण्यास सांगितले आहे,' असे सर्व ३५ विद्यार्थ्यांचे वकील चिन्मय इनामदार यांनी सांगितले.
२०२२मध्ये इनामदार यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून डीव्हीडीची प्रत सरकारी पक्षाकडून मागितली होती. मात्र, पोलिसांनी व्हिडीओ फुटेज किंवा डीव्हीडीची प्रत त्यांच्यासोबत शेअर केलेली नाही. गेल्या नऊ वर्षांत आंदोलनात सहभागी झालेल्या आणि या प्रकरणात आरोपी असलेल्या एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांना काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागले. हे प्रकरण अद्याप सुनावणीच्या टप्प्यात आलेले नाही. तर, त्यांच्यापैकी काहींना पासपोर्ट न मिळण्यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागले आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही बंद करण्यात आली होती,' अशी माहिती आंदोलनात आघाडीवर असलेल्या आणि या प्रकरणी अटक झालेल्या अमेय गोरे यांनी दिली.
पायलच्या बाबतीत तिची शिष्यवृत्ती निलंबित करणाऱ्या एफटीआयआयने २०१७ मध्ये 'आफ्टरनून क्लाऊड्स' या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी कान्सला गेल्यावर प्रवासाचा खर्च उचलून तिला आधार दिला. पायलने कान्समध्ये विजेतेपद पटकावल्यानंतर एफटीआयआयने रविवारी तिचे अभिनंदन केले. "एफटीआयआयच्या माजी विद्यार्थ्यांनी कान्समध्ये इतिहास रचला हा एफटीआयआयसाठी अभिमानाचा क्षण आहे... ग्रां प्री पुरस्कार जिंकल्याबद्दल पायल कपाडिया, पियरे अँजेनिक्स ट्रिब्यूट पुरस्कार मिळाल्याबद्दल संतोष सिवन, अॅसिडमध्ये पदार्पण केल्याबद्दल मैसम अली आणि ला सिनेफ जिंकल्याबद्दल चिदानंद एस नाईक यांचे आम्ही अभिनंदन करतो. त्यांचे कर्तृत्व भारतीय चित्रपटसृष्टीला अधिक उंचीवर घेऊन जात आहे.'
संबंधित बातम्या