बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने नुकतेच इन्स्टाग्रामवरून त्याच्या लग्नाचे फोटो हटवले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लवकरच आई-बाबा होणार आहेत. या आनंदाच्या दरम्यान रणवीरने दोघांचे सगळे फोटो डिलीट केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. दोघेही लवकरच पालक होणार आहेत. रणवीरने फोटो डिलीट केल्यानंतर त्यांच्या लग्नात काही अडचण आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, या सगळ्या चर्चांच्या दरम्यान, रणवीर नुकताच एका कार्यक्रमात पोहोचला आणि तिथे त्याने असे काही वक्तव्य केले की या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
नुकताच रणवीर एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी रणवीरला विचारण्यात आले की, त्याच्या हृदयाच्या जवळ असलेले दागिने कोणते आहेत. यावर रणवीर सिंह म्हणाला की, त्याला दीपिका पदुकोणने घातलेली त्याच्या लग्नाची अंगठी खूप आवडते. याशिवाय प्लॅटिनमची अंगठी जी त्यांच्या साखरपुड्याची आहे, ती देखील त्याच्यासाठी खूप जवळची आहे. रणवीरने असेही सांगितले की, त्याच्या आईचे हिऱ्याचे झुमके आणि आजीचे मोतीचे दागिने देखील त्याच्या हृदयाजवळचे आहेत. आता दोघांमध्ये सर्व काही ठीक असल्याचं रणवीरने सांगितल्याने चाहते खूश झाले आहेत.
अलीकडेच रणवीर आणि दीपिका एकत्र सुट्टीवर गेले होते. यादरम्यान, दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बेबी बंप देखील दिसला होता. दोघेही त्यांचा बेबीमून एन्जॉय करत असल्याचे बोलले जात होते. रणवीर आणि दीपिकाने नोव्हेंबर २०१८मध्ये लग्न केले आणि आता दोघे सप्टेंबर २०२४मध्ये पालक बनणार आहेत. दोघांनी सोशल मीडियावर आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली.
त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर रणवीर आणि दीपिका आता ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात रणवीरसोबत दीपिकाही पोलीस अधिकारी बनली आहे. या दोघांशिवाय या चित्रपटात अजय देवगण, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांच्याही भूमिका आहेत. रोहित शेट्टी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटाशिवाय दीपिका ‘कल्की २८९८एडी’मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये प्रभास आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या