AR Rahman Angry : संगीतकार एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांनी नुकतेच सोशल मीडियावर हे दोघे एकमेकांपासून वेगळे होत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर दोघांचे वैयक्तिक आयुष्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या विभक्तहोण्याबद्दल चर्चा करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर एआर रहमान यांनी आपल्या खासगी आयुष्याविषयी बातम्या बनवणाऱ्या यूट्यूबर्स आणि प्लॅटफॉर्म्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटीसमध्ये आपल्यासाठी लिहिलेला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे.
एआर रहमान यांनी आपल्या खासगी आयुष्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलणाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. एआर रहमान यांनी आपल्या सोशल मीडियावर ही नोटीस शेअर केली आहे. एआर रहमान आणि त्यांच्या पत्नीच्या विभक्त होण्याच्या बातमीबद्दल काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि काही यूट्यूबर्स बदनामीकारक लेख लिहित आहेत, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. या दोघांच्या विभक्त होण्याच्या सर्व प्रकारच्या कथा लोक बनवत आहेत. अशा प्रकारचा आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मागणी नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
या नोटिशीत म्हटले आहे की, ज्यांनी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला आहे, त्यांना १ तास आणि जास्तीत जास्त २४ तासांच्या आत त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून असा मजकूर काढून टाकावा लागेल. तसे न झाल्यास अशा लोकांविरोधात मानहानीचा खटला दाखल केला जाईल', असे नोटीसमध्ये म्हटले आहे. असे न करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३च्या कलम ३५६ अंतर्गत फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत गुन्हेगारांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. त्यात म्हटले आहे की, नोटीस 'विशेषत: यूट्यूब, एक्स, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर ऑनलाइन न्यूज पोर्टलवर लागू होते.'
लग्नाच्या २९ वर्षांनंतर एआर रहमान आणि सायरा बानो यांनी विभक्त होण्याची घोषणा केली आहे. जेव्हा एआर रहमान आणि सायरा यांनी विभक्त होण्याची घोषणा केली, त्यानंतर काही वेळातच एआर रहमानच्या टीममधील सदस्य मोहिनीनेदेखील आपल्या पतीपासून विभक्त होण्याची घोषणा केली. मोहिनीच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर एआर रहमान आणि मोहिनीच्या लिंकअपच्या अफवा पसरू लागल्या. एआर रहमान यांच्या मुलानेही अशा बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी अशा बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. तर मोहिनी डे यांनीही अशा बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.