Deepika Padukone Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच ‘बाफ्टा अवॉर्ड्स २०२४’मध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरात चिमुकलं बाळ येणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हणण्यात आलेय की, अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा दुसरा त्रैमासिक सुरू असून, आता लवकरच ती आई होणार आहे.
‘द वीक’च्या रिपोर्टनुसार, असा दावा केला जात आहे की दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच पालक होणार आहेत. या जोडीच्या एका जवळच्या सूत्राने याबद्दल माहिती देताना अभिनेत्री आई होणार असल्याचे सांगितले आहे. या सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, दीपिका आणि रणवीरने स्वतः त्याच्यासोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. ही जोडी लवकरच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहे.
तर, याबद्दल अधिकची माहिती देताना सूत्राने पुढे सांगितले की, सध्या दीपिका पदुकोणचा दुसरा त्रैमासिक सुरू आहे. म्हणजे दीपिका ४ ते ५ महिन्यांची गर्भवती आहे. नुकतीच दीपिका पादुकोण हिने बाफ्टा अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. तेव्हापासून तिचा हा लूक देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. बाफ्टा अवॉर्ड शो दरम्यान देखील अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा बेबी बंप दिसत असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, सध्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्याकडून या आनंदाच्या बातमीवर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, या दोघांकडून ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या बातमीत किती तथ्य आहे, हे केवळ दीपिका आणि रणवीरच सांगू शकतील.
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांची प्रेमकहाणी 'रामलीला' चित्रपटाच्या सेटवरच सुरू झाली होती. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर २०१८मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. बॉलिवूडची लोकप्रिय जोडी गुडन्यूज कधी देणार याची चाहत्यांना देखील उत्सुकता आहे. एकीकडे दोघेही आपापल्या कामात प्रचंड व्यस्त आहेत. दीपिका लवकरच साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'कल्की २८९८ एडी' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. तर, रणवीर सिंह 'सिंघम ३' आणि 'डॉन ३' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.