Deepika Padukone Daughter First Pics: बॉलिवूडचे ‘बाजीराव-मस्तानी’ अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे चित्रपट चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीचे पालक झाले. आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लेकीची झलक दाखवली आहे. त्यांनी सोशल मीडियावर मुलीचा फोटो शेअर केला आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलीचा एक अतिशय गोंडस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तिचे नावही सगळ्यांना सांगितले आहे.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या मुलीचा हा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये या जोडप्याच्या मुलीचा चेहरा दिसत नसला, तरी तिचे छोटे पाय खूपच गोंडस दिसत आहेत. फोटोमध्ये या त्यांची मुलगी आई दीपिकाच्या मांडीवर दिसत आहे. या दोघींनीही लाल रंगाचा सूट परिधान केला आहे.
दिवाळीनिमित्त त्यांच्या मुलीचा हा सुंदर फोटो शेअर करताना रणवीर-दीपिकाने लेकीचे नावही जाहीर केले आहे. रणवीर-दीपिकाने त्यांच्या मुलीचे नाव ‘दुआ पादुकोण सिंह’ ठेवले आहे. फोटो शेअर करताना जोडप्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'दुआ पादुकोण सिंह, 'दुआ': म्हणजे प्रार्थना... कारण ती आमच्या प्रार्थनांचे उत्तर आहे. आमचे हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले आहे. दीपिका आणि रणवीर'
आता दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर तिचे चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टला काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. यूजर्ससोबतच सेलेब्सही या फोटोवर कमेंट करत आहेत. दीपिकाची बेस्टी आलिया भट्टनेही यावर कमेंट केली आहे आणि अनेक रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
दीपिका आणि रणवीरने फेब्रुवारीमध्ये अभिनेत्रीच्या ‘गुड न्यूज’बद्दल चाहत्यांना सांगितले होते. रणवीर अनेकवेळा मुलाखतींमध्ये दीपिकाच्या प्रेग्नेंसीबद्दल बोलताना दिसला होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिंघम अगेन' या चित्रपटात दिसले आहेत. त्यांचा हा चित्रपट १ नोव्हेंबरला रिलीज झाला आहे. या चित्रपटात दोघांच्याही कॅमिओ भूमिका आहेत. यानंतर रणवीर सिंह ‘धुरंदर’ आणि ‘डॉन ३’ या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, दीपिकाच्या आगामी प्रोजेक्ट्सबाबत काहीही अपडेट समोर आलेली नाही. तिने अद्याप आपल्या नवीन प्रकल्पांची घोषणा केलेली नाही.