दीपिका- रणवीरने प्रभादेवीचा फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  दीपिका- रणवीरने प्रभादेवीचा फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

दीपिका- रणवीरने प्रभादेवीचा फ्लॅट दिला भाडे तत्त्वावर, महिन्याचे भाडे ऐकून बसेल धक्का

Aarti Vilas Borade HT Marathi
Nov 20, 2024 01:12 PM IST

दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंग यांचा प्रभादेवीमध्ये एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्यांनी भाडे तत्त्वावर दिला आहे. या फ्लॅटचे भाडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

Deepika Padukone and husband Ranveer Singh
Deepika Padukone and husband Ranveer Singh

बॉलिवूड कलाकारांची घरे ही कायमच चर्चेत असतात. कारण त्यांची आलिशान घरे नेहमीच आकर्षण ठरतात. बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंगने काही वर्षांपूर्वी प्रभादेवीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. रणवीर आणि दीपिका अनेकदा या फ्लॅटवर एकत्र वेळ घालवताना दिसले होते. आता त्यांनी हा फ्लॅट भाडे तत्त्वावर दिल्याची माहिती समोर आली आहे. दीपिकाच्या या घराचे भाडे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.

दीपिका पदुकोण आणि पती रणवीर सिंग यांनी मुंबईतील प्रभादेवी भागातील फ्लॅट भाडे तत्त्वार दिला आहे. त्यांचा हा फ्लॅट ब्यू मोंडे टॉवर्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडमध्ये आहे. २४ व्या मजल्यावरील हा फ्लॅट २,३१९ स्क्वेअर फूट कार्पेटमध्ये पसरलेला आहे. प्रभादेवी मध्य मुंबईत वसलेली असून पश्चिम आणि मध्य उपनगर तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि वरळी-वांद्रे सी लिंक सारख्या प्रमुख रस्त्यांशी चांगली जोडलेली आहे. हा परिसर प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरासाठी ओळखला जातो. दादर बीच आणि हाय स्ट्रीट फिनिक्स सारखी लोकप्रिय स्थळे येथे आहेत.

स्क्वेअरयार्ड्सच्या म्हणण्यानुसार, दीपिकाचा हा फ्लॅट तीन कार पार्किंगसहीत भाडे तत्त्वावर दिला आहे. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी भाडे कराराची नोंदणी करण्यात आली. अरुणा बाबूलाल वर्मा असे या भाडेकरुचे नाव आहे. पहिल्या १८ महिन्यांसाठी मासिक भाडे ७ लाख रुपये ठेवण्यात आले असून उर्वरित १८ महिन्यांसाठी ७.३५ लाख रुपयांपर्यंत भाडे व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यवहारासाठी ६६ हजार २०० रुपये मुद्रांक शुल्क आणि एक हजार रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

दीपिका पदुकोणचा रिअल इस्टेट पोर्टफोलिओ

दीपिका पदुकोणची अश्विन शेठ ग्रुपच्या ब्यु मोंडे टॉवर्स या लक्झरी निवासी प्रकल्पात २, ३, ४ आणि ५ बीएचके अपार्टमेंट्सची मालकी आहे. सप्टेंबर 2024 मध्ये दीपिका पदुकोणची कंपनी केए एंटरप्रायजेसने मुंबईतील वांद्रे पश्चिम भागात १८४५ चौरस फुटांचा फ्लॅट १७.७ कोटी रुपयांना खरेदी केला होता. शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याजवळ असलेल्या सागर रेशम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या १५ व्या मजल्यावर दीपिकाने एक फ्लॅट खरेदी केला आहे. अपार्टमेंटचा बिल्ट-अप एरिया रेट ९६,४०० रुपये प्रति चौरस फूट आहे. या व्यवहारावर सुमारे एक कोटी सात लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात आल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट आहे.
वाचा: ८ अफेअर्स, ३ लग्न करुनही आज आहे एकटी, पतीच्या अंत्यसंस्काराला गेली नाही झीनत अमान

सप्टेंबर २०२१ मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी अलिबागमधील मापगाव नावाच्या गावात ९००० चौरस मीटर जागेत पसरलेला ५ बीएचके बंगला २२ कोटी रुपयांना खरेदी केला होता.

Whats_app_banner