
९० च्या दशकात बॉलिवूड राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दिव्या भारती. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, ५ एप्रिल १९९३ साली दिव्या भारतीचे निधन झाले. तिच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. वयाच्या १९व्या वर्षी दिव्याचे अपघाती निधन कसे झाले याचा अद्याप खुलासा झालेला नाही. तिचा मृत्यू बॉलिवूडसाठी आजही एक रहस्य ठरले आहे.
दिव्या भारतीचा जन्म २५ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत झाला. तिने १९९० साली प्रदर्शित झालेल्या 'बोबिली राजा' या तेलुगू चित्रपटातून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. 'विश्वात्मा' या हिंदी चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटातील 'सात समुंदर पार' या गाण्याने तिला वेगळी ओळख मिळवून दिली होती. दोन वर्षातच दिव्याने स्वत:ची अशी ओळख निर्माण केली.
वाचा: मराठी मनोरंजन विश्वात पुन्हा एकदा हटके प्रयोग; मिलिंद शिंदे साकारणार ‘मूक’ खलनायक!
दिव्या भारतीने शाहरुख खान सोबत 'दिवाना' या सिनेमात काम केले होते. गोविंदासोबत दिव्याने 'शोला और शबनम' या सिनेमात काम केले. 'दिल आशना है' या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले होते. दिव्या भारतीच्या कुटुंबीयांपैकी कुणीही सिनेसृष्टीतले नव्हते. 'रंग' हा दिव्या भारतीचा अखेरचा सिनेमा ठरला. 'शतरंज' हा सिनेमा आधी शूट झाला होता मात्र तो तिच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला.
५ एप्रिल १९९३ साली दिव्या भारतीचा वर्सोवा येथील फ्लॅटच्या बाल्कनीमधून खाली पडून मृत्यू झाला. दिव्या भारतीचा मृत्यू ज्याप्रकारे झाला त्यानंतर त्या घटनेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. तिच्या मृत्यूचे गूढ अजूनही कायम आहे. दिव्याच्या मृत्यूला जवळपास ३० वर्षे झाली आहेत. मात्र ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
संबंधित बातम्या
