Who Is Jasmin Walia: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या गेल्या काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. आधी पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबत घटस्फोट, नंतर अनन्या पांडेला डेट करत असल्याच्या बातम्या आणि आता ताज्या माहितीनुसार हार्दिक सध्या जॅस्मिन वालियासोबत आहे. हार्दिक आता जॅस्मिनला डेट करत असून, दोघेही सुट्टीसाठी एकत्र ग्रीसला गेले होते, असे म्हटले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण आहे जॅस्मिन वालिया, जिचे नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडले जात आहे.
जॅस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते. लंडनमधील एसेक्समध्ये जन्मलेल्या जॅस्मिनचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. 'द ओनली वे इज एसेक्स' या ब्रिटीश रियॅलिटी टीव्ही मालिकेचा भाग बनल्यानंतर जॅस्मिनने पहिल्यांदा जगाचे लक्ष वेधून घेतले होते. तिने २०१० मध्ये या शोमध्ये ‘एक्स्ट्रा’ म्हणून सुरुवात केली. पण, २०१२ पर्यंत ती या शोची मुख्य कलाकार बनली. या शोच्या माध्यमातून जॅस्मिनला एंटरटेन्मेंट इंडस्ट्रीत सर्वात जास्त ओळख मिळाली.
या शोनंतर जॅस्मिनने म्युझिक इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि २०१४ मध्ये तिचे यूट्यूब चॅनेल लाँच केले. चॅनलवर इतरांची गाणी गाऊन जॅस्मिन आपली प्रतिभा दाखवत होती. तिने जॅक नाइट, इंटेन्स-टी आणि ग्रीन म्युझिकशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर तिला २०१७मध्ये सर्वात मोठा ब्रेक मिळाला तो 'बोड डिजी'च्या माध्यमातून. जॅस्मिनने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि २०१८ मध्ये 'सोनू के टीटू की स्वीटी' या बॉलिवूड चित्रपटासाठी 'बम डिगी डिगी बम' या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली.
२०२२मध्ये जॅस्मिन वालियाने ‘बिग बॉस १३’चा फायनलिस्ट असीम रियाजसोबत ‘नाईट्स एन फाइट्स’ नावाचा म्युझिक व्हिडीओ केला होता. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. या व्हिडीओने आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधले होते. ‘टाईम्स स्क्वेअर’च्या होर्डिंगवरही त्याला स्थान मिळालं होतं. जॅस्मिन सोशल मीडिया सेन्सेशन असून, एकट्या इन्स्टाग्रामवर तिचे ६.४ लाख फॉलोअर्स आहेत. युट्यूबवर जॅस्मिनला ५.७ लाख लोकांनी सबस्क्राईब केले आहे. ती अनेकदा तिचे बोल्ड आणि सनसनाटी फोटो पोस्ट करत असते, जे खूप व्हायरल होतात.