Dadasaheb Phalke Awards 2024 Shah Rukh Khan: बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानने गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. आता शाहरुख खानला त्याच्या कामासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. नुकताच 'दादा साहेब फाळके पुरस्कार २०२४' हा सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात शाहरुख खानला 'जवान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा हा पुरस्कार स्वीकारताना शाहरुख खान भावूक झाला होता. यावेळी शाहरुख खान म्हणाला की, मी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकेन, असे वाटतच नव्हते.
नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, यामध्ये शाहरुख खान 'दादा साहेब फाळके पुरस्कार २०२४' मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर परीक्षकांचे आभार मानले आहेत. यादरम्यान शाहरुख म्हणाला की, ‘परीक्षकांचे आभार, ज्यांनी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पात्र मानले. मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळून बरीच वर्षे झाली आणि आता मला पुन्हा हा पुरस्कार मिळणारच नाही, असे वाटत होते. मी खूप आनंदी आहे आणि मला पुरस्कार खरंच आवडतात. हो मी थोडा लोभी आहे आणि या चित्रपटासाठी अनेक लोकांची खूप मेहनत आहे.’ यानंतर शाहरुख खानने पुन्हा सर्वांचे आभार मानले.
आता किंग खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर यूजर्सकडूनही भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. यावर एका यूजरने लिहिले की, ‘किंग इज किंग. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘तू आमच्या मनाचा बादशहा आहे.’ दुसऱ्या एका यूजरने लिहिले की, ‘शाहरुख खान... आज मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे.’ दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली की, ‘या वर्षातील पुरस्कारसाठी अगदी योग्य अभिनेता.’ आता किंग खानच्या या व्हिडीओवर यूजर्स अशा कमेंट करत आहेत.
गेल्या वर्षी शाहरुख खानने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात कोणतीही कसर सोडली नाहीय. गेल्या वर्षी शाहरुख खान एक-दोन नव्हे, तर तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. यात 'पठान', 'जवान' आणि नंतर 'डंकी', या सगळ्या चित्रपटांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच तिकीट खिडक्यांवर कल्ला केला होता. शाहरुखच्या या तीन ही चित्रपटांनी प्रचंड कमाई केली. या चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. चाहत्यांनाही त्याचे हे चित्रपट खूप आवडले आणि प्रेक्षकांनी या चित्रपटांना उदंड प्रतिसाद दिला होता.
संबंधित बातम्या