मराठी सिनेसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून दादा कोंडके ओळखले जातात. दादा कोंडके यांचं आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. दादा त्यांच्या चित्रपटामुळे कायमच वादग्रस्त राहिले. त्यांच्या या वादांचे अनेक किस्से त्यांनी आपल्या एकटा जीव या आत्मचरित्रात नमूद केले आहेत. त्यापैकीच एक गाजलेला किस्सा म्हणजे दादा आणि ओशोंची भेट.
दादांच्या एकटा जीव या आत्मचरित्रात दादांनी ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातील एका वादग्रस्त सीन आणि पात्रामुळे घडलेला किस्स्याचे वर्णन केले आहे. दादांनी बुवाबाजी या विषयावर विनोद केला होता. ज्यामध्ये एक बाबा चमत्काराने हातातून, काखेतून गणपती, आंगठ्या, सुपारी अशा वस्तू काढून दाखवतात. हे पात्र सत्यसाईबाबांवर बेतले होते. दादांना ही कल्पना उषा मंगेशकर यांनी सांगितलेल्या किस्स्यांवरून आली होती.
एकदा उषा ताई दादांना म्हणाल्या होत्या कि सत्य साईबाबांनी दिदींना चमत्कार करत गणपती काढून दिला. मग दादांनी विचारले, त्यांनी तुम्हाला काय दिलं? 'ही काय चेन दिली ना' असे गळ्यातली चेन दाखवतं उषाताई म्हणाल्या. 'मग तुमच्या सेक्रेटरीला काय दिलं? अस प्रश्न दादांनी केला. 'सुपारी' आशाताई म्हणाल्या. दादांनी मनात म्हटलं तिच्या मायला, कमालीचा आहे माणूस. मोठ्या माणसाला मोठ्या वस्तू आणि छोट्या माणसाला छोट्या वस्तू देतात. ही कथा ऐकूनच दादांनी अशा बुवाचं कॅरेक्टर चित्रपटात टाकलं होतं.
बुवाचे सीन शूट करताना दादांनी दोन-तीन हिप्पी आणले होते. दादा व जयश्री टी आश्रमात जातात. तिथे लोळत असणाऱ्या हिप्पींच्या पायात पाय अडकून पडतात. असा सीन होता. मात्र शॉटच्या वेळी दादांचा पाय एका चरस प्यायलेल्या हिप्पी बाईच्या पायात अडकला आणि दादा धाडकन तिच्या बाजूला पडले. दादांनी उठायचा प्रयत्न करीत असतानाच त्या बाईने त्यांना घट्ट मिठी मारली. शॉट तर चालू होता आणि ती काही त्यांना सोडायला तयार होईना. ती बाई गालांचे नुसते मुके घेत होती. दादांनी कसबसं स्वतःला सोडवून घेतलं. आणि सीन चित्रित झाला.
चित्रपट प्रदर्शित झाला आणि कुणी तरी आध्यत्मिक गुरु ओशो रजनीश यांना जाऊन सांगितलं की, दादा कोंडके नावाच्या एका माणसाने तुमच्यावर विनोद केला आहे. एक दिवस ओशोंच्या अमरीश भट नावाच्या सेक्रेटरीचा फोन दादांना आला, 'आचार्य, रजनीशजींनी तुम्हाला भेटायला बोलावलं आहे.' तो शुद्ध मराठीत बोलत होता. पहिल्यांदा त्यांच्या फोनकडे दादांनी फारसं लक्ष दिलं नाही. मग पुन्हा त्याचे १०/१२ वेळा फोन आले. शेवटी दादांनी रजनीशांना जाऊन भेटायचं ठरवलं. मांढरे नावाच्या मित्राने दादांनी म्हटले, 'दादा, त्या आश्रमातल्या बायका आपण गेलं की एकदम गळ्यातच पडतात. जरा सांभाळून जा. आणि त्या बायकांना माँ म्हणायचं असतं.'
मग दादांनी भटना फोन केला. त्याना म्हटलं, 'मी येईन, पण तुमच्या त्या माँ वगैरे असतात त्याचं काय करायचं?' भट म्हणाले,' तुम्ही येताय ना. बस्स. आमची माणसं दरवाजावर उभी असतील, तुम्ही आल्याबरोबर ती तुम्हाला आतमध्ये घेऊन येतील.' दादा मांढरेलाच घेऊन रजनीशांच्या आश्रमात गेले. तिथे दादांचा खूप आदरसत्कार झाला. मग मांढरेला बाहेरच बसवून भटने दादांना ओशोंच्या दालनाकडे नेलं. दादांनी पूर्वी कधीतरी ऐकलं होतं की त्यांच्याकडे सोन्याचं सिंहासन आहे.
दादांनी प्रत्यक्षात बघितलं तर खरंच सोन्याचं सिंहासन होतं. तिथेही बऱ्याच बायका बसल्या होत्या. सगळ्या देखण्या. मध्यम वयापासून तरुण वयापर्यंत सगळ्या बायका भरलेल्या. दादानं वर बघायला भीती वाटत होती. कुणाकडे बघायचं आणि कसं बघायचं. सगळीकडे सेंट आणि धुपाचा, घमघमाट सुटला होता. ओशोंना भेटल्यावर आपण असं बोलायचं, कसं उत्तर द्यायचं असं दादांनी मनाशी ठरविलं होतं. पण तिथलं ते वातावरण बघूनच दादा गार झाले. तेवढ्यात रजनीश आले. दादांना म्हणाले, 'बैठीये, सुना है आप मराठी पिक्चरमें बहोत अच्छा काम करते हैं। मगर आपने मेरे बारेमें पिक्चरमें जो दिखाया हैं, असलमें ऐसा नहीं हैं. मैं लोगोंको ज्ञान बताता हूँ, और कुछ नहीं. आप बोल रहे थे मेरे सेक्रेटरी को की आश्रम की लडकीयाँ गलेमें पड़ेगी. लेकीन वह बेहोश हैं, यह उनकी एक्साइटमेंट हैं, और कुछ नहीं.'
वाचा: पाहुण्या कालाकारांच्या भूमिकेत दिसले ४८ कलाकार, बॉक्स ऑफिसवर ठरला होता हिट! ओळखा पाहू
दादांनी रजनीशांना म्हटलं, 'आपको किसीने गलत बताया हैं की मैंने आपके सटायर किया है , बल्की मैंने आपके उपर नाही, सत्यसाईबाबा के उपर सटायर किया हैं.' दादांच्या या बोलण्यावर रजनीशांनी फक्त हलकसं स्मितहास्य केलं. त्यांनी दादांचा हात हातात घेतला. त्या स्पर्शात इतकी जादू होती की दादा सुद्धा दोन मिनिटं एका वेगळ्या दुनियेत गेले. 'मी कोण आहे, कुठे आलो आहे, याचा विसर दादांना पडला. त्यांचा हात लोण्यासारखा मऊ होता. दादा तो स्पर्श कधीही विसरू शकले नाही, ती २ मिनिट दादांच्या आयुष्यातले सर्वात विस्मयकारी असे क्षण होते. असं दादांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलंय.
संबंधित बातम्या